अभिजात दर्जासाठी पंतप्रधानांना आग्रह - मुख्यमंत्री

नितीन नायगांवकर
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदा) - ‘‘अभिजात दर्जा मिळावा, यासाठी माझ्यासह विनोद तावडेंनी खूप प्रयत्न केले. यासंदर्भातील संपूर्ण प्रक्रियाही वेळोवेळी पूर्ण केली. आता लवकरच साहित्यिकांचे शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आणि अभिजात दर्जासाठी आग्रह धरणार,’’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. तसेच पुढील वर्षीपासून साहित्य संमेलनाचे अनुदान २५ लाखांवरून ५० लाख रुपये करण्याचेही त्यांनी जाहीर केले.

सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदा) - ‘‘अभिजात दर्जा मिळावा, यासाठी माझ्यासह विनोद तावडेंनी खूप प्रयत्न केले. यासंदर्भातील संपूर्ण प्रक्रियाही वेळोवेळी पूर्ण केली. आता लवकरच साहित्यिकांचे शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आणि अभिजात दर्जासाठी आग्रह धरणार,’’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. तसेच पुढील वर्षीपासून साहित्य संमेलनाचे अनुदान २५ लाखांवरून ५० लाख रुपये करण्याचेही त्यांनी जाहीर केले.

बडोदा येथे ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटन सोहळ्यात ते बोलत होते. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त गुर्जर साहित्यिक रघुवीर चौधरी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन झाले. या वेळी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, स्वागताध्यक्ष राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड, संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मावळते अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, पद्मश्री डॉ. सीतांशू यशचंद्र, बडोदा वाङ्‌मय परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोपकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. डॉ. काळे यांनी या वेळी लक्ष्मीकांत देशमुख यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपविली. डॉ. श्रीपाद जोशी यांनी प्रास्ताविकातूनच अभिजात दर्जा आणि अनुदानासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून भाष्य व्हावे, अशी अपेक्षा केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी दोन्हींच्या संदर्भात घोषणा केली. संमेलनाच्या शेवटच्या दिवशी होणाऱ्या ठरावांवर अर्थसंकल्पी अधिवेशन आटोपल्यानंतर बैठक घेऊन चर्चा करू, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी दिला. 

मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘गोंदियामधील अर्जुनी मोरगावला अखिल भारतीय संत साहित्य संमेलनही सुरू आहे. एक हजार किलोमीटरच्या अंतरावर दोन वेगवेगळ्या राज्यांमधील संमेलनात साहित्यप्रेमी उत्साहाने सहभागी होतात, हा विलक्षण योगायोग आहे. जेवढी साहित्य संमेलने मराठीत, तेवढी इतर कुठल्याही भाषेत नाहीत. हीच मराठीची ताकद आहे. उत्तम प्रशासक म्हणून ओळख असलेले सयाजीराव गायकवाड यांच्या नगरीत मराठी साहित्य संमेलन होणे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे.’’

रोखठोक कौतुक!
मुख्यमंत्र्यांनी गुजरातमध्ये जाऊन गुजराती भाषेचे, लोकांचे कौतुक केले म्हणून काहींना खटकेलही. त्यावर एखादा ‘रोखठोख’ अग्रलेखही प्रकाशित होऊ शकतो. पण, मला त्याचे काही वाटत नाही, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

गुजरात आणि महाराष्ट्रात वातावरण मुक्तच
मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना श्रोत्यांमधून एकाने ‘बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र’ अशी घोषणा दिली. मुख्यमंत्र्यांनी ‘झालेच पाहिजे’ असे म्हणत ही घोषणा पूर्ण केली. काही वेळाने मुख्यमंत्र्यांनी मराठी विद्यापीठावर बोलायला सुरवात केली तेव्हा आणखी एकाने ‘विद्यापीठ रिद्धपूरमध्येच झाले पाहिजे’ अशी घोषणा दिली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, की दोन वेगवेगळ्या मागण्या अतिशय शिस्तीत करण्यात आल्या, हे साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य आहे. जोशींनी फक्त मराठी विद्यापीठाचीच मागणी केली. मात्र, इथे त्याहीपलीकडे जाऊन रिद्धपूरची मागणी होत आहे. आम्ही मराठी विद्यापीठासाठी सकारात्मक आहोत. त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही वातावरण मुक्तच आहे, याची श्रीपाद जोशी यांनी दखल घ्यावी, असा टोला त्यांनी लगावला.

Web Title: marathi news Sayajirao Gaikwad Sahityanagari Baroda Literature Conference devendra fadanvis