'माझ्या मते, श्रीदेवींची हत्याच..'

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

भाजपचे नेते सुब्रमण्यम् स्वामी यांनीही हा मृत्यू बॉलीवूड व अंडरवर्ल्ड यांच्या कनेक्शन मधून झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 

मुंबई : बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनानंतर, त्यांचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. याचे अनेक नवनवीन पैलू देखील समोर येत आहेत. या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते सुब्रमण्यम् स्वामी यांनीही हा मृत्यू बॉलीवूड व अंडरवर्ल्ड यांच्या कनेक्शन मधून झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 

'माझ्या मते श्रीदेवी जास्त प्रमाणात मद्य पीत नसून, कधीतरी काही अंशी बीअरचे सेवन करत होत्या, त्यामुळे हा नैसर्गिक मृत्यू नसून ही हत्या आहे', असा अंदाज एका वृत्तसंस्थेशी बोलताना स्वामी यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर या मृत्यूचा संबंध त्यांनी बॉलीवूड व अंडरवर्ल्ड कनेक्शनशी जोडला. 

याबाबत बोलताना, हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज का तपासले नाही? असाही सवाल त्यांनी केला. कुटूंबातील लग्नसमारंभासाठी दुबईत गेलेल्या श्रीदेवी हॉटेलच्या रूममधील बाथरूमच्या बाथटबमध्ये बेशुध्दावस्थेत सापडल्या. त्यावेळी त्यांचे पतीही तेथे उपस्थित होते. पण अद्यापही त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतेही स्पष्टीकरण समोर आलेले नाही.     

Web Title: Marathi news Sridevi murdered subramniam swamy bjp leader