Marathi news Supreme Court controversy what SC judges are angry
Marathi news Supreme Court controversy what SC judges are angry

सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींचा संयम का सुटला...?

जगभरात नावाजलेले भारतीय सर्वोच्च न्यायालय आज (शुक्रवार) अचानक एेतिहासिक वळणावर आले. सुप्रीम कोर्टाच्या चार ज्येष्ठ न्यायमूर्तींनी अभूतपूर्व पाऊल उचलत आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आणि न्यायव्यवस्था धोक्यात असल्याचा इशारा दिला. सुप्रीम कोर्टाच्या गेल्या 68 वर्षांच्या इतिहासात न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन असे विधान करण्याची घटना पहिल्यांदाच घडली. सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्याबद्दलची नाराजी या चारही न्यायमूर्तींनी उघडपणे व्यक्त केली.

भारतीय राज्य घटनेच्या चौकटीत सर्वोच्च न्यायालयाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे, चार ज्येष्ठ न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेणे आणि सरन्यायाधिशांवर अविश्वास प्रकट करणे ही घटना अभूतपूर्व ठरली आहे. 

सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींमध्ये सुरू असलेली खदखद अचानक बाहेर येण्यामागे काय कारणे असावीत, याबद्दल देशभरात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. सीबीआयचे विशेष न्यायाधिश बी एच लोया यांचा आकस्मित मृत्यू आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती नियुक्तीचे रोस्टर ही दोन कारणे असावीत, असा चर्चेचा सूर आहे. लोया यांच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित होत असल्याचे कारण आजच्या पत्रकार परिषदेमागे असल्याचे न्या. गोगोई यांनीही मान्य केले आहे. 

जस्ती चेलामेश्वर, राजन गोगई, मदन लोकूर आणि कुरियन जोसेफ अशी या चार ज्येष्ठ न्यायमूर्तींची नावे आहेत. 'भारतात लोकशाही टिकवायची असेल, तर न्यायव्यवस्था टिकविण्यासाठी तत्काळ पावले उचलली पाहिजेत,' असे या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

या पत्रकार परिषदेचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. माजी न्यायमूर्तींनी विद्यमान चार न्यायमूर्तींची कृती खेदजनक असल्याचे म्हटले आहे; तर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. 

एेतिहासिक घटनेचे असे उमटताहेत पडसाद :

  1. सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन सरन्यायाधिशांवर टीका केली. 
  2. सर्वोच्च न्यायालयातील दुसऱया क्रमांकाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती जस्ती चेलामेश्वर यांनी 'सर्वोच्च न्यायालय नीट काम करीत नाही,' असे विधान केले.
  3. माजी सरन्यायाधिश के जी बालकृष्णन यांनी या घटनेला 'दुर्देवी' संबोधले. 'सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी न्यायमूर्तींनी बोलायला नको होत्या,' असे मत त्यांनी मांडले. 
  4. सर्वोच्च न्यायालयातील बार असोसिशएनने उद्या (शनिवार) तातडीची बैठक बोलावली आहे. आजच्या घटनेवर बैठकीत चर्चा होईल. 
  5. भारताचे अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांची भेट घेतली; तथापि माध्यमांसमोर बोलायचे टाळले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com