देशाचे उद्योग धोरण लवकरच : सुरेश प्रभू

अवित बगळे
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू म्हणाले, उद्योगांचा विकास करण्यावर भर असेल. एक मोठा उद्योग आला की त्याला पुरवठा करण्यासाठी छोटे व मध्यम उद्योग आपसूक येतात. हरियानात मारुतीचा उद्योग उभा राहिला. पण शेकडो छोटे व मध्यम उद्योग त्या परिसरात उभे राहिले आहेत. या धर्तीवर उद्योग आणून त्यांना सोयीचे वातावरण करण्यासाठी जिल्हावार विभाग सुरू केले जातील. देशातील 630 जिल्ह्यांत उद्योग विकासाचे ध्येय आहे. 

पणजी (गोवा) : देशाचे उद्योग धोरण लवकरच तयार केले जाईल. उद्योजकांना आपला व्यवसाय करणे सोपे व्हावे, यासाठी अशा धोरणाची गरज आहे. सध्या त्या धोरणाविषयी सल्लामसलत सुरू केली आहे, अशी माहिती केंद्रीय उद्योग आणि वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे दिली. 'गोमन्तक भवन'मध्ये 'कॉफी विथ गोमन्तक' या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आसोचाम या राष्ट्रीय पातळीवरील उद्योजकांच्या संघटनेतील लघु व मध्यम उद्योग समितीचे अध्यक्ष मांगिरीश पै रायकर होते. 

आता वाणिज्य खातेही 
केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये मी उद्योगमंत्री होतो. त्यावेळी त्या मंत्रालयात तीन खाती होती. नंतर ती स्वतंत्र करण्यात आली. गेल्या 20-22 वर्षात 9-10 खात्यांचे काम केंद्रीय पातळीवर केले आहे. व्यापार, उद्योगाशी निगडित खाती मी हाताळली. मात्र वाणिज्य खाते माझ्याकडे कधी दिले गेले नव्हते. आता वाणिज्य खाते मिळाल्याने त्या आघाडीवरही काम करण्याची संधी मिळाली आहे. 

चीनला सेवा पुरविणार 
निर्यात म्हटली की, केवळ वस्तूंची निर्यात असे डोळ्यासमोर येते. भारतातून अनेक सेवा निर्यात केल्या जाऊ शकतात. आजवर हा विषय दुर्लक्षित राहिला होता. त्याकडे आता लक्ष देण्यात येत आहे. आता सध्या चीनशी यासंदर्भात चर्चा सुरू आहे. जगात केवळ वस्तूंची निर्यात ही संकल्पना मागे पडत चालली आहे. डॉक्‍टर, सनदी लेखापाल, अभियंते यांच्या सेवांची निर्यात केली जाऊ शकते. त्याकडे सरकारचे लक्ष आहे, असे केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू म्हणाले. 

उद्योगांना प्रोत्साहन देणार 
केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू म्हणाले, भारत जागतिक व्यापार संघटनेत आहे. त्याचा फायदा आहे. अनेक देशांशी व्यापारविषयक करार आहे. याचा फायदा उद्योगांना करून दिला जाणार आहे. जगाच्या एकूण पोलाद उत्पादनापैकी 12-15 टक्के पोलाद आपण उत्पादित करतो. त्याच्या सात ते 10 पट उत्पादन चीनमध्ये होते. साहजिकपणे त्यांचे दर तुलनात्मकदृष्ट्या कमी असतात. अशा परिस्थितीत स्थानिक उत्पादकांना संरक्षण देण्याची सरकारची भूमिका असते. ती अधिक व्यापक केली जाणार आहे. ती सर्व क्षेत्रांना लागू होईल. 

कृषी उत्पन्नांचे निर्यात 
केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू म्हणाले, उपलब्ध जमीन आणि कृषी उत्पादन याचा मेळ बसत नाही. उत्पादन जास्त झाले तर दर घसरण्याचा धोका असतो. त्यामुळेही उत्पादन वाढीकडे शेतकऱ्यांचे जास्त लक्ष नसते. मात्र कृषी उत्पन्नाला निर्यातीची जोड दिली गेल्यास हा धोका राहणार नाही. कृषी उत्पन्न वाढले तरी कृषी उत्पन्न वापरात वाढ होणार नाही. कांदा स्वस्त झाला म्हणून कोणी एका ऐवजी दोन कांदे खाणार नाही. कृषी उत्पन्न निर्यातीसाठी धोरण नाही. ते तयार करावे लागणार आहे. कृषी उत्पन्नाची निर्यात वाढली की गुणवत्तेत वाढ होईल, त्यात ग्राहकाचाही फायदा आहे. 

अनेक गोष्टी निगडित 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया, इज ऑफ डुईंग बिझनेस, स्टार्टअप इंडिया या योजना जाहीर केल्या. त्याची अंमलबजावणी आपल्याच मंत्रालयाकडे असल्याचे सांगून केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू म्हणाले, टी बोर्ड, कॉफी बोर्ड, रबर बोर्ड, एमएमटीसी असा मोठा व्याप मंत्रालयाकडे आहे. उद्योगशीलता वाढीस लावणे आणि व्यापारातील तूट कमी करणे याकडे सध्या लक्ष पुरविले आहे. 

पुरवठा हा एकत्रित विषय 
केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू म्हणाले, आजवर पुरवठा (लॉजिस्टिक्‍स) हा विषय सुटा सुटा चर्चेला घेतला जात असे. कोणत्याही एका मंत्रालयाकडे त्याची जबाबदारी दिलेली नव्हती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडे पुरवठा (लॉजिस्टिक्‍स) हा विषय सोपवला आहे. त्यात, रेल्वे, रस्ते, विमानतळापासून साठवणूक व्यवस्थेपर्यंत सारेकाही येते. ही सुद्धा एक मोठी जबाबदारी आहे. 

गुंतवणुकीचा महामार्ग निर्मिणार 
केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू म्हणाले, विदेशी गुंतवणूक वाढीवर भर देण्यात येत आहे. त्यासाठी जगातील पाचशे बड्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी बोलणे सुरू केले आहे. त्यांना भारतात व्यवसाय करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून गुंतवणूक आणून त्यातून रोजगार निर्मितीवर भर दिला जाईल. त्यांना चटदिशी संपर्क साधणे सोपे व्हावे, यासाठी हॉटलाईन सुरू करण्याचाही विचार आहे. देशात गुंतवणुकीला पूरक असे वातावरण तयार करणार आहे.

विदेशी मंत्र्यांच्याही संपर्कात 
मनीला येथे झालेल्या परिषदेवेळी 26 देशांच्या उद्योग, व्यापार मंत्र्यांशी बोलता आले. त्यातून व्यापाराला चालना देता येणार आहे. त्याशिवाय डिसेंबरमध्ये अर्जेंटिनामध्ये जागतिक व्यापार संघटनेच्या परिषदेसाठी जाणार आहे. पुढील महिन्यात अमेरिकेच्या व्यापारमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी अमेरिकेला जाणार आहे. इतर देशांशी संपर्क वाढला की व्यापार वाढेल, तेथून गुंतवणूक येईल, अशी संकल्पना यामागे आहे. 

जिल्हावार होणार विभाग 
केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू म्हणाले, उद्योगांचा विकास करण्यावर भर असेल. एक मोठा उद्योग आला की त्याला पुरवठा करण्यासाठी छोटे व मध्यम उद्योग आपसूक येतात. हरियानात मारुतीचा उद्योग उभा राहिला. पण शेकडो छोटे व मध्यम उद्योग त्या परिसरात उभे राहिले आहेत. या धर्तीवर उद्योग आणून त्यांना सोयीचे वातावरण करण्यासाठी जिल्हावार विभाग सुरू केले जातील. देशातील 630 जिल्ह्यांत उद्योग विकासाचे ध्येय आहे. 

केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे "गोमन्तक'चे व्यवस्थापक दयानंद प्रभुगावकर यांनी पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत केले. सहयोगी संपादक किशोर शां. शेट मांद्रेकर यांनी स्मृतिचिन्ह प्रदान केले. वरिष्ठ प्रतिनिधी अवित बगळे यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले. यावेळी 'गोमन्तक टाईम्स'चे निवासी संपादक शाश्‍वत गुप्ता रे, वरिष्ठ वितरण व्यवस्थापक अनिल शेलार, प्रीप्रेस व्यवस्थापक हृषिकेश आठवले, मुख्य उपसंपादक प्रवीण पाटील, उपसंपादक यशवंत पाटील, उपसंपादक संदीप कांबळे, प्रतिनिधी तेजश्री कुंभार, वरिष्ठ कार्यपालक (कार्मिक व प्रशासन) सुनील भौंसुले, वरिष्ठ कार्यपालक (माहिती तंत्रज्ञान) संजय हंद्राळे, भाषांतरकार शंतनू गरुड, "गोमन्तक टाईम्स'चे प्रतिनिधी क्‍लाईव्ह आल्वारीस, निबेदिता सेन, मुख्य प्रतिनिधी विठ्ठलदास हेगडे उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news Suresh Prabhu new industrial policy gomantak