चेहराही बनणार 'आधार'; एक जुलैपासून नवी पद्धत 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 जानेवारी 2018

नवी दिल्ली : 'आधार' कार्डाच्या साह्याने ओळख पटविण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या बायोमेट्रिक म्हणजेच बोटांचे ठसे आणि बुबुळांचा रंग यांच्याबरोबर आता संबंधित व्यक्तीच्या चेहऱ्याचाही समावेश करण्यात आला आहे. 'आधार' प्राधिकरणाने आज हा निर्णय जाहीर केला. यामुळे व्यक्तीची ओळख पटविण्यात आणखी सुलभता येईल असे मानले जात आहे. 

नवी दिल्ली : 'आधार' कार्डाच्या साह्याने ओळख पटविण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या बायोमेट्रिक म्हणजेच बोटांचे ठसे आणि बुबुळांचा रंग यांच्याबरोबर आता संबंधित व्यक्तीच्या चेहऱ्याचाही समावेश करण्यात आला आहे. 'आधार' प्राधिकरणाने आज हा निर्णय जाहीर केला. यामुळे व्यक्तीची ओळख पटविण्यात आणखी सुलभता येईल असे मानले जात आहे. 

शारीरिक श्रमाची कामे करणाऱ्या व्यक्ती, तसेच वयाने ज्येष्ठ व्यक्तींच्या बोटांचे ठसे हे अनेक वेळेस 'आधार' कार्डात समाविष्ट ठशांशी जुळत नसल्याच्या तक्रारी वाढत होत्या. विशेषतः राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) काम करणाऱ्या आणि इतरही तत्सम अंगमेहनतीची कामे करणाऱ्या श्रमजीवींबाबत ही अडचण प्रामुख्याने निर्माण झाली होती.

बोटाचे ठसे जुळत नसल्याने या गरीब श्रमजीवींना सरकारी साह्यापासून, त्यांच्या वेतनापासूनही वंचित राहण्याची पाळी येऊ लागली होती व त्याबाबतच्या तक्रारी वाढत चालल्या होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर आता चेहऱ्याच्या आधारे म्हणजेच 'आधार' कार्ड काढताना घेतलेले छायाचित्र व त्यातील चेहरा याच्याशी संबंधितांचा चेहरा पडताळून पाहून ओळख पटविण्याची पद्धतही अवलंबिण्यात येईल. 

'आधार' कार्डाची व त्यातील माहितीची सुरक्षितता अभेद्य नसल्याचे काही प्रकार उघडकीस आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून 'आधार' कार्डाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करण्याचे उपाय सुरू झाले आहेत. त्यामध्ये 'आधार' क्रमांकापेक्षा एक वेगळा सांकेतिक 16 आकडी क्रमांक 'आधार' कार्डधारक स्वतःच तयार करू शकतात असे प्राधिकरणातर्फे जाहीर करण्यात आले आणि ज्यांना त्यांच्या 'आधार'वरील माहितीची गोपनीयता राखायची असेल त्यांना ही पद्धत अवलंबिण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर आजवरील आणखी एका नव्या उपायाचा समावेश करण्यात आला आहे.

31 मार्चपर्यंत सर्व 'आधार' कार्डधारकांना त्यांचा 'आधार' क्रमांक मोबाईल फोनपासून सर्व सरकारी सेवा सुविधांशी जोडण्याचे बंधन घालण्यात आले आहे. अन्यथा बॅंकिंग सेवा, विमा, वेतन, पेन्शन यांसारख्या सेवा मोबाईल आणि अन्य माहिती तंत्रज्ञानविषयक सुविधा या बंद करण्यात येणार आहेत. 

एकमेव निकष मात्र नाही 
अर्थात, चेहरेपट्टी जुळण्याचाच एकमेव ओळख पटविण्याचा निकष नसेल. इतर निकषांशी संलग्न असाच हा निकष असेल आणि संमिश्र पद्धतीनेच हे निकष अमलात आणले जातील, असे 'आधार' प्राधिकरणातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजे चेहरा आणि बोटांचे ठसे किंवा चेहरा व बुबुळांचा रंग अशा संमिश्र पद्धतीने व्यक्तीची ओळख पटविण्यात येईल.

केवळ चेहरेपट्टीचा एकमेव निकष लागू होणार नाही. एक जुलै 2018 पासून ही नवी पद्धत अमलात येईल. अर्थात, आवश्‍यकतेनुसारच ही पद्धत अवलंबिण्यात येईल.

Web Title: marathi news UIDAI Facial Recognition Aadhar Card