'नाही' कधी पचवणार आपला समाज?

Marathi News_Article_Acid Attack_NO means NO_Shiwani khorgade
Marathi News_Article_Acid Attack_NO means NO_Shiwani khorgade

प्रतिक्षा म्हेत्रे प्रकरण ताजेच असताना आणखी एक दुष्कृत्य करण्याची हिंम्मत अमरावतीत झाली. अशी हिंमत करायला आजकाल तसा मोठं शहर काय आणि लहान शहर काय...गाव काय आणि खेडं काय...कुणीही धजावतं...या हिंमतीला खत पाणी घालणारं वातावरणही आपल्या समाजात निर्माण झालंय. पालक आणि आजची शिक्षण व्यवस्था मुलांना व्यवहार शिकवतात. पण संवेदनशीलतेचे संस्कार नाही आणि अशीच मुलं एकतर्फी प्रेमातून हल्ला करतात. आज जरी स्पर्धेचं युग आहे, तरी व्यवहारापेक्षा संवेदनशीलता शिकवली जाणं फारच महत्त्वाचं होऊन बसलंय. अॅसिड हल्ला करण्यापर्यंत आपण निर्दयी बनलो आहोत. यापेक्षा माणसाची अधोगती अजून काय असू शकेन!

काल अमरावतीत एकतर्फी प्रेमातून नववीतील मुलीवर अॅसिड हल्ला झाला आणि लोकांच्या काळजात पुन्हा एकदा तात्पुरती ठिणगी पडली. ही ठिणगी घटनेपुरती मनात जळजळ निर्माण करणारी असते. एकदा घटना इतिहास जमा झाली की याच मनातल्या जळजळीची केवळ राख उरलेली असते. हे आता कितीतरी उदाहरणांवरुन सिद्ध झाले आहे. बारा वर्षांपूर्वी घडलेल्या दीपाली कुलकर्णी प्रकरणाच्या आठवणी गेल्याच आठवड्यात प्रतिक्षा म्हेत्रेच्या खुनाने ताज्या झाल्या होत्या. दीपालीला घरात घुसून जिवंत जाळले होते. प्रतिक्षाला भर रस्त्यात चाकुने वार करुन मारण्यात आले. आता नववीत असणाऱ्या इतक्या लहान वयाच्या मुलीवर अॅसिड हल्ला केला गेला. या सर्व प्रकरणात एक गोष्ट सारखी आहे ती अशी की या तिघींनीही त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांना नाकारले होते. एकतर्फी प्रेम प्रकरणात 'नाही' हा शब्द आपल्या समाजात तरी जीवापर्यंत बेतणारा ठरतोय. तो ठरवला जातोय. 'नाही' या शब्दाला किंमत नाहीये. पण तरी या शब्दाने कित्येक मुलींना आपला जीव नाहक गमवावा लागत आहे. राधा, रुख्मिणी, सावित्रीबाई, अहिल्याबाई आणि अशा कित्येक जणींच्या आचरणाच्या ओव्या गाणारे आपण मुलींचे 'नाही' हे आचरण पचवू शकत नाहीये! मनाला इतक्या थराची कोरड पडेपर्यंत आपण प्रवास केलाय पण ही कोरड अजूनही संपावी असा प्रयत्नही आपण खऱ्या अर्थाने करतोय का? हा सवालच स्वतःशी कधी केला जात नाही. म्हणून आजचा सोशल मीडीया अॅडिक्टेट समाज अशा घटनांनी सुन्न आहे.

काल अॅसिड फेकले त्या मुलीला आरोपी मुलाने घटनेच्या काही दिवसांपूर्वी पत्र लिहीले होते. त्या पत्राला आणि त्याच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून मुलीने त्याच्या थोबाडीत मारली. या सगळ्याचा राग त्याने अॅसिड फेकून व्यक्त केला. आपण प्रेम योग्य पद्धतीने भलेही व्यक्त करणे शिकलो नसू; पण राग मात्र नको त्या पद्धतीने व्यक्त करणे आपण शिकलो आहोत. प्रतिक्षाचीही हीच कहाणी. लग्नाला दिलेला नकार पचवू न शकल्याने तिची बदनामी केली गेली. बदनामीनंतरही न ऐकल्यामुळे तिचा जीव घेतला गेला. तिने आणि तिच्या घरच्यांनी पोलिसांत पाच वेळा तक्रार करुनही पोलिसांनी हवी ती कारवाई केली नाही. उलट जेव्हा तो मुलगा दिसेल तेव्हा आम्हाला कळव, असा सल्ला तिला देण्यात आला. तो मुलगा दिसून, खुन करुन गेला आणि पोलिसांचा निष्काळजीपणा या खुनाच्या कारणांपैकी एक ठरला. पालकांनी सुद्धा इथे लक्षात घेण्याची गोष्टं अशी की पोलिसात तक्रार म्हणजे ती केवळ ठाणेदारापर्यंतच मर्यादीत नाही ना राहत आहे, याचीही काळजी घ्यायला हवी. आपल्या तक्रारीने होणारा त्रास बंद झाला नाही तर केवळ ठाणेदारापुरतीच तक्रार न ठेवता आणखी वरच्या स्तरावरील लोकांपर्यंत म्हणजे एसीपी, डीसीपी, सीपी, आमदार, पालकमंत्री अशा शक्य त्या प्रत्येक यंत्रणेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. कुटुंबियांची सतर्कता आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची भूमिका फारच महत्त्वाची ठरते. याची दुसरी बाजू अशीही की माणसातील विकृती इतकी वाढली आहे की जर अशा त्रासाविरुद्ध तक्रार केली तरी त्याची खुन्नस ठेवली जाईल, अशीही भीती असते. कोपर्डीसारख्या इतक्या मोठ्या खटल्याचा धडधडीत निर्णयही समाजातील या भयानक घटनांना लगाम लावू शकला नाही! हा गुंता इतका आहे, तो उलगडला की केवळ उलगडतच जाईल...

संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज अशा लोकसंतांची, पंजाबराव देशमुखांसारखे दृ्ष्टे नेतृत्व लाभलेली व शिक्षण आणि सांस्कृतिक वारसा असलेली भूमी आज अशा घटनांनी मलिन होतेय. पोलिसांची पकड शहरातील गुन्ह्यांवर राहीलेली नाही, धाक तर उरलेलाच नाही, समाजसेवकांना आम्ही बघा ही ही भूमिका घेतोय याच्या दिखाऊपणातून बाहेर पडता येत नाहीये, राजकारणी एक आठवड्यापूर्वी तेवढ्याच तीव्रतेच्या घडलेल्या घटनेपेक्षा कालच्या घटनेत जास्तं व्यक्तं होताहेत...ही अन् अशी बरीच कारणं...भावना बधिर होऊन जाव्यात, अशाच या घटना...ही बधिरता संपण्याची 'गरज' कुणाच्या लक्षात येत नाहीये, हे दुर्दैव. माणसातली माणुसकी संपू नये आणि आपल्या पुढच्या पिढीला तरी निदान ती टिकून राहावी म्हणून धडपडू लागू नये यासाठी आपणच संवेदनशीलतेचे संस्कार समाजात रुजवू शकू का? यासाठी काय प्रयत्न केले जाणे अपेक्षित आहे? याविषयी जरा विचार करुया...
(आपल्या प्रतिक्रिया webeditor@esakal.com वर पाठवू शकता. सकाळ संवाद अॅप डाऊनलोड करून सविस्तर लेखही आमच्यापर्यंत पाठवू शकता.) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com