मराठी मंडळींचे मंदिर २७० वर्षांपासून! (व्हिडिओ)

Ayodhya-Marathi-Temple
Ayodhya-Marathi-Temple

अयोध्या - अयोध्येत महाराष्ट्रातील मराठी मंडळींचे एक मंदिर सुमारे २७० वर्षांपासून आहे, हे माहिती आहे का? अन्‌ या मंदिरात ‘रामपंचायतम’ असून, त्यात रामचंद्र, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या एकाच शिलेत घडलेल्या प्राचीन मूर्तीही आहेत. अयोध्येतील सात मंदिरात समावेश असलेल्या काळेराम मंदिर ट्रस्टच्या या मंदिराकडे दिवसेंदिवस मराठी भाविकांची संख्या वाढती आहे.

अयोध्येत सुमारे ५ हजार मंदिरे आहेत. शरयू नदीच्या किनाऱ्याजवळ नागेश्‍वरनाथ मंदिराशेजारी काळेराम ट्रस्टचे मंदिर आहे. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे एकाच काळ्या पाषाणात घडविलेल्या रामचंद्र, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या त्यात मूर्ती आहेत. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या या मूर्ती असल्याचे सांगितले जाते. सुमारे १५२८ मध्ये अयोध्येवर आक्रमण झाले, तेव्हा या मूर्ती शरयूच्या डोहात टाकण्यात आल्या होत्या. तपश्‍चर्येसाठी नगरहून अयोध्येत पोचलेल्या नरसिंहराव मोघे यांना १७४८ मध्ये त्या सापडल्या. शरयूच्या डोहातून त्यांनी या मूर्ती बाहेर काढल्या आणि जवळच एका पिंपळाच्या झाडाखाली ठेवल्या. कालांतराने मोघे यांच्या प्रयत्नांतून टप्प्याटप्प्याने मंदिर अस्तित्त्वात आले, अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक गोपाळ देशपांडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितली. काळेराम मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून त्याचे संचलन होते. या ट्रस्टचे माधव लिमये (ग्वाल्हेर), पुरुषोत्तम वैदिक (अयोध्या), अनिल जोगळेकर (उदयपूर), प्रभाकरराव गोहदकर (ग्वाल्हेर), धनंजयराव खेर (मुंबई), विनम्र खण्डकर (झांशी), विजय भागवत (लखनौ) हे विश्‍वस्त आहेत. 

या मंदिरात भाविकांच्या राहण्याचीही सुविधा आहे. तसेच रामनवमीला येथे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतात अन्‌ त्यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश येथूनही भाविक मोठ्या संख्येने येतात, असे देशपांडे यांनी सांगितले. अयोध्येत मराठी कुटुंबे फारशी नाहीत. देशपांडे कुटुंबीयांची तिसरी पिढी येथे कार्यरत असून, राघवेंद्र देशपांडे मुख्य व्यवस्थापक आहेत. अयोध्येतील बदलांचे साक्षीदार असलेले गोपाळ म्हणाले, ‘‘अयोध्येत मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. रामजन्मभूमी खटल्याचा निकाल लागल्यामुळे आता अयोध्येच्या विकासाला वेग येईल. वाद एकदाचा मिटल्यामुळे आता भाविक निर्धास्तपणे येतील आणि श्रीरामाचे दर्शन घेतील.’

आता ‘मेकओव्हर’ची प्रतीक्षा
राम मंदिर उभारण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आता अयोध्येचे मेकओव्हर करण्यासाठी आराखडा तयार केला जात आहे. रिसॉर्ट, पंचतारांकित हॉटेल, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बस टर्मिनल आणि विमानतळ याचा समावेश असणार आहे. याशिवाय उत्तर प्रदेश सरकारने शरयू नदीवर क्रुझ सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे. 

नंतर अयोध्येच्या विकासासाठी आरखडा तयार केला जात आहे. याबाबत अयोध्या मंडळाचे माहिती उपसंचालक मुरलीधर सिंह यांनी माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com