नव्या संसाराची सुरवात बालाजीच्या आशीर्वादाने

आर. एच. विद्या
शुक्रवार, 19 मे 2017

विवाहाची तारीख आणि मुहूर्त आदीची माहिती दिल्यानंतर जोडप्यास पोचपावती देण्यात येईल. प्रत्यक्ष विवाहाच्या सहा तास आधी संबंधित जोडप्याला अधिकृत प्रमाणपत्र जमा करावे लागेल. यानंतर देवस्थान समिती पाहुण्यांच्या राहण्याची सोय आणि भटजीचीही सोय करेल

तिरुमला / हैदराबाद - येथील जगप्रसिद्ध बालाजी मंदिरामध्ये भाविकांना विवाह सोहळा आयोजित करणे आणखी सोपे झाले आहे. भाविकांना इंटरनेट सेवेच्या माध्यमातून काही दिवस आधीच लग्न सोहळ्याचे बुकिंग करता येईल. माहिती तंत्रज्ञानाच्या वापराबाबत अधिक सकारात्मक असलेल्या देवस्थान समितीने भक्तांसाठी तिरुपती कृपेची ही नवी विंडो ओपन केली आहे. विवाहेत्सुक जोडप्याला यासाठी काही दिवस आधीच www.ttdsevaonline.com या संकेतस्थळावर ऑनलाइन बुकिंग करावे लागेल. यामध्ये त्यांना आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पालकांची आणि निवडक नातेवाइकांची माहिती द्यावी लागेल. "कल्याण मंडपम' या कॉलममध्ये ही सगळी माहिती भरावी लागेल. विवाहाचे वय तपासण्यासाठी वैध जन्मप्रमाणपत्र, दहावीची गुणपत्रिका, पासपोर्ट, चालक परवाना आणि पॅन कार्ड यांची माहिती द्यावी लागेल. विवाहाची तारीख आणि मुहूर्त आदीची माहिती दिल्यानंतर जोडप्यास पोचपावती देण्यात येईल. प्रत्यक्ष विवाहाच्या सहा तास आधी संबंधित जोडप्याला अधिकृत प्रमाणपत्र जमा करावे लागेल. यानंतर देवस्थान समिती पाहुण्यांच्या राहण्याची सोय आणि भटजीचीही सोय करेल. निवासस्थानासाठी 50 रुपये प्रतिदिवस असा दर आकारण्यात येईल. या वेळी दहा लाडूही देण्यात येतील. लग्नासाठी लागणाऱ्या अन्य साहित्याची तजवीज मात्र जोडप्याच्या नातेवाइकांना करावी लागणार आहे.

जोडप्याला विशेष दर्शन
या विवाहसमारंभास पालकांना उपस्थित राहणे शक्‍य नसेल, तर त्यांना तसे अनुपस्थिती दर्शक प्रमाणपत्र देवस्थान समितीकडे सादर करावे लागेल. देवस्थान समिती नवविवाहित जोडप्यास तीनशे रुपयांचे विशेष दर्शन तिकीट उपलब्ध करून देईल. देवस्थान समितीकडूनच मोफत ग्रुप फोटोही काढण्यात येईल. जोडप्याच्या अन्य चार नातेवाइकांनाही मोफत प्रवेश दिला जाईल.

Web Title: Married Couples to have Lord Balaji's Blessings