साताऱ्याच्या जवानाला काश्मीरमध्ये वीरमरण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

भारतीय जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या चकमकीत 27 वर्षीय दीपक घाडगे शत्रूच्या माऱ्याचे लक्ष्य बनले आणि युद्धभूमीवरच त्यांना वीरमरण आले.

श्रीनगर : काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याशी लढताना सातारा येथील जवान दीपक जगन्नाथ घाडगे यांना वीरमरण आले. मूळचे साताऱ्यातील बोरगाव येथील असलेले घाडगे जम्मू काश्मीरमधील पूँच सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात धारातीर्थी पडले. 

हुतात्मा घाडगे यांचे पार्थिव आज (शुक्रवार) संध्याकाळी पुणे विमानतळावर पोचणार आहे. त्यानंतर ते साताऱ्याला नेण्यात येईल. उद्या (शनिवार) त्यांच्या बोरगाव या मूळ गावी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे सांगण्यात आले. 

दीपक घाडगे यांच्यामागे त्यांची आई, वडील, पत्नी, दोन वर्षांचा मुलगा आणि एक वर्षांची मुलगी असा परिवार आहे. गुरुवारी दुपारी 2 वाजता भारतीय चौक्यांवर आणि पूँच सेक्टरमध्ये ताबारेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने गोळीबार सुरू केला. भारतीय जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या चकमकीत 27 वर्षीय दीपक घाडगे शत्रूच्या माऱ्याचे लक्ष्य बनले आणि युद्धभूमीवरच त्यांना वीरमरण आले. घाडगे यांच्या मृत्युमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: martyr deepak ghadage's body will reach tonight