हुतात्मा जवानाची पत्नी म्हणते, संधी द्या; दहशतवाद्यांची डोकी उडवते

वृत्तसंस्था
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

माझे पती मला रोज फोन करत होते. हल्ला झाला त्या दिवशी ते काही कामात होते. नंतर फोन करतो, असे म्हणाले; पण नंतर त्यांचा फोन आलाच नाही. त्या दिवशी त्यांच्याशी माझे बोलणे झाले नाही. अजून सैन्यात 10 वर्षे सेवा करायची आहे, असे ते मला सांगायचे. पोलिस होण्याची त्यांची फार इच्छा होती.

बंगळूर : सैन्यात सेवा करण्याची संधी द्या. दहशतवाद्यांची डोकी उडवून माझ्या पतीचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करते, असे स्फूर्तिदायी उद्‌गार मंड्यातील हुतात्मा एच. गुरू यांच्या पत्नी कलावती यांनी काढले. त्या रविवारी मंड्यात पत्रकारांशी बोलत होत्या. 

आपल्या मनातील दु:ख बाजूला सारून भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या, "माझ्या पतीची अपूर्ण राहिलेली इच्छा मला पूर्ण करायची आहे. एका वीर जवानाची पत्नी म्हणून सांगण्यास मला अभिमान वाटतो. देशाची सेवा करताना माझ्या पतीला वीरमरण आले आहे. त्यांनी अर्धे काम केले आहे. बाकीचे काम पूर्ण करण्यास मी सज्ज आहे. यासाठी मला सैन्यदलात नोकरी द्यावी.'' 

माझे पती मला रोज फोन करत होते. हल्ला झाला त्या दिवशी ते काही कामात होते. नंतर फोन करतो, असे म्हणाले; पण नंतर त्यांचा फोन आलाच नाही. त्या दिवशी त्यांच्याशी माझे बोलणे झाले नाही. अजून सैन्यात 10 वर्षे सेवा करायची आहे, असे ते मला सांगायचे. पोलिस होण्याची त्यांची फार इच्छा होती. यासाठी पोलिसाचा गणवेश घालून त्यांनी फोटोही काढला होता. मनात कसलीच भीती बाळगू नका, असे सांगून ते सर्वांना धीर देत होते, असे सांगून त्यांनी आपले दु:ख व्यक्त केले. देशभक्त जवानांना ठार करणाऱ्या दहशतवाद्यांना आता सोडायचे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पाकिस्तानला क्षमा करता कामा नये, अशी जोशपूर्ण भावना त्यांनी व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: martyred jawan H Guru wife talked against terrorist