मसूद अझरनेच रचला कट

Masood Azhar
Masood Azhar

नवी दिल्ली : पठाणकोठ येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणाचा तपास आवरता घेत राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले. पाकिस्तानातील जैशे मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझर, त्याचा भाऊ आणि इतर दोघांचीही आरोपपत्रात नावे आहेत. चालू वर्षी दोन जानेवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप या चौघांवर ठेवण्यात आला आहे. या दहशतवादी हल्ल्यात सात जण हुतात्मा झाले होते, तर 37 जण जखमी झाले होते.


पंचकुलातील "एनआयए'च्या विशेष न्यायालयात आज पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी "एनआयए'ने आरोपपत्र दाखल केले. पाकिस्तानातील जैशे मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझर, त्याचा भाऊ मुफ्ती अब्दुल रौफ असगर, हल्ल्याचे सुत्रधार शाहीद लतीफ आणि कशीफ जान या चौघांच्या नावांचा आरोपपत्रात समावेश आहे. यातील जान वगळता इतर तिघांच्या विरोधात इंरटपोलने "रेड कॉर्नर' नोटीस जारी केली आहे, तर जान याच्या विरोधातही "रेड कॉर्नर' नोटीस काढण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे "एनआयए'ने म्हटले आहे.

"एनआयए'ने दाखल केलेल्या आरोपपत्रात पठाणकोट हल्ल्यात चार दहशतवादी सहभागी असल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी सहभागी झाले होते, याबाबत परस्परविरोधी विधाने करण्यात आली होती. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी हल्ल्यात सहा दहशतवादी सहभागी झाले असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे आता दहशतवाद्यांच्या संख्येबाबतचाही गोंधळ थांबण्यास मदत होणार आहे.
नासीर हुसेन, हाफीझ अबू बकर, उमर फारुख आणि अब्दुल कय्यूम अशी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांची नावे आहेत. हे सर्व जण पाकिस्तानी नागरिक असून, ते जैशे मोहम्मदचे सदस्य आहेत. सुरक्षा दलांनी या सर्वांना कंठस्नान घातले होते. या चौघांनी दोन जानेवारी रोजी सकाळी पठाणकोठ हवाई तळाच्या परिसरात प्रवेश केला होता. सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारात आणि एका शेडमध्ये ते दडून बसले होते. हवाई दलाच्या तळामध्ये प्रवेश केल्यानंतर तब्बल 19 तासांनी म्हणजेच दोन जानेवारी रोजी दुपारी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला होता, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

पठाणकोट हल्ल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाकिस्तानी तपास पथकाने पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळाची पाहणी केली होती. तसेच, त्यांना या संदर्भातील पुरावे आणि कागदपत्रेही उपलब्ध करून देण्यात आली होती. सुरक्षा दलांचे कर्मचारी वगळता इतरांची चौकशी करण्याची परवानगीही पाकिस्तानी तपास पथकाला दिली होती. मात्र, पाकिस्तानात परतल्यानंतर भारताने या प्रकरणी आवश्‍यक तेवढे पुरावे दिले नसल्याचा आरोप केला होता.

मसूदच्या विरोधात वापर
या प्रकरणी सादर करण्यात आलेल्या आरोपपत्राचा वापर अझर मसूद याच्या विरोधात भारताकडून करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मसूदवर बंदी घालण्याची मागणी भारताने संयुक्त राष्ट्रांकडे अनेकदा केली आहे. इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे 1999मध्ये अपहरण केल्यानंतर तुरुंगात असलेल्या मसूदची भारताकडून सुटका करण्यात आली होती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com