संपत्तीची चौकशी आत्ताच का: मायावती

वृत्तसंस्था
रविवार, 15 जानेवारी 2017

गेल्या अडीच वर्षांत सरकार याबाबत मौन का पाळून का होते? त्यांचे माझ्याविरोधातील कारस्थान त्यांच्यावरच उलटेल

लखनौ - उत्तर प्रदेश राज्यामधील निवडणुकीचा ज्वर आता दिवसेंदिवस अधिकाधिक भडकू लागला असून या पार्श्‍वभूमीवर विविध राजकीय पक्षांमध्येही धुळवडीस प्रारंभ झाला आहे. बहुजन समाज पक्षाच्या (बसप) नेत्या मायावती यांनी आज (रविवार) भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेतृत्व असलेल्या केंद्र सरकारला लक्ष्य केले.

गेल्या महिन्यात सक्तवसुली संचलनालयाच्या चौकशीत बसपाशी संबंधित असलेल्या बॅंक खात्यामध्ये तब्बल 104 कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. याचबरोबर, मायावती यांचे बंधु आनंद यांच्या युनायटेड बॅंक ऑफ इंडिया या बॅंकेमधील खात्यामध्येही 1.43 कोटी रुपये जमा झाल्याचेही आढळून आले होते. या पार्श्‍वभूमीवर संतप्त मायावतींनी आज भाजपवर जोरदार हल्ला चढविला.

""निवडणूक जवळ येत असतानाच भाजपच्या सरकारला माझ्या कुटूंबीयांच्या व्यवसायांमध्ये अनियमितता दिसू लागली आहे. जर ही अनियमितता इतकी गंभीर आहे; तर गेल्या अडीच वर्षांत सरकार याबाबत मौन का पाळून का होते? त्यांचे माझ्याविरोधातील कारस्थान त्यांच्यावरच उलटेल,'' असे मायावती म्हणाल्या.

याचबरोबर, देशातील विविध राजकीय पक्षांमधील उच्चस्तरीय 300 नेत्यांची मालमत्ता तपासल्यास सत्य परिस्थिती कळून येईल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्‍त केले.

Web Title: Mayawati slams BJP