दलितांच्या नावावर गैरव्यवहार लपवता का? : रवीशंकर प्रसाद

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या खात्यावर 104 कोटी रुपये सापडल्याच्या पार्श्‍वभूमीवर संतप्त मायावतींना प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी मायावती यांना 'दलितांच्या नावावर गैरव्यवहार लपवत आहात का?' असा प्रश्‍न विचारला आहे.

नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या खात्यावर 104 कोटी रुपये सापडल्याच्या पार्श्‍वभूमीवर संतप्त मायावतींना प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी मायावती यांना 'दलितांच्या नावावर गैरव्यवहार लपवत आहात का?' असा प्रश्‍न विचारला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रसाद म्हणाले, "मायावती दलितांच्या नावावर गैरव्यवहार लपवत आहेत का? हा दलितांविरुद्धचा कट असून या संदर्भातील चौकशीची मागणी योग्य आहे का? त्या करत असलेला भ्रष्टाचार हा दलितांच्या हक्कांसाठी असल्याचे त्या म्हणत आहेत. हा दलितांचा अवमान आहे.' मोदींवर मायावतींकडून होत असलेले आरोप निराधार आणि निषेधार्ह असल्याचेही प्रसाद यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, "मायावती माध्यमांतील वृत्तांवर प्रतिक्रिया देत आहेत. आम्ही त्यांच्या खात्यातील जमा रकमेबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही भाष्य केलेले नाही. त्या रक्कम जमा करण्यात आल्याचे वृत्त नाकारत नाहीत. त्यामुळेच ही रक्कम म्हणजे नियमित पक्षनिधी होता की काळा पैसा बदलण्याचा प्रकार यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहेत.'

सत्ताधारी भारतीय जनता पक्ष सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केला आहे. बहुजन समाज पक्षाने नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर बॅंकेत 104 कोटी रुपये जमा केले आहेत. तर, मायावती यांच्या भावाच्या खात्यावर 1 कोटी 34 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीतील करोलबाग येथील युनियन बॅंकेवर छापा टाकला. त्यामध्ये ही बाब समोर आली. या पार्श्‍वभूमीवर प्रसाद बोलत होते.

Web Title: Mayawati using Dalit card to hide her corruption: Ravi Shankar Prasad