मायावती भाजपशी हात मिळवतील - अखिलेश

वृत्तसंस्था
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

मायावती कोणत्याही क्षणी भाजप नेत्यांना राखी बांधून पुन्हा एकदा रक्षाबंधन साजरा करण्याच्या तयारीत असून, बसपला सत्ता मिळू नये, यासाठी जनतेने सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे

सिद्धार्थनगर - समाजवादी पक्षाची घोडदौड रोखण्यासाठी बहुजन समाजवादी पक्ष (बसप) कधीही भाजपशी हातमिळवणी करू शकतो, अशी शक्‍यता मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज व्यक्त केली. भाजप जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

अखिलेश म्हणाले, ""मायावती कोणत्याही क्षणी भाजप नेत्यांना राखी बांधून पुन्हा एकदा रक्षाबंधन साजरा करण्याच्या तयारीत असून, बसपला सत्ता मिळू नये, यासाठी जनतेने सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे. मायावती एकाअर्थी भाजपला आत्ताच मदत करत आहेत. सर्व पक्ष सपला रोखण्याचा प्रयत्न करत असून, यात त्यांना यश येणार नाही.''

राज्यातील पोलिस ठाणी सपचे अड्डे बनल्याची टीका मोदींनी केली होती. त्याविषयी अखिलेश म्हणाले, ""कदाचित मोदींना हे माहीत नाही, की राज्यात आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. 100 नंबरवर मदत उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. मात्र, आता तातडीने अवघ्या 10-15 मिनिटांत त्यांची दखल घेतली जाते. पोलिस खात्यातील रिक्त पदे व इतर बाबींना सरकार प्राधान्य देत आहे.''

सप हा गरीब व शेतकऱ्यांचा पक्ष असून, इतर पक्षांनी केलेल्या कार्याशी तुलना केल्यास सपचे कार्य वरचढ ठरेल, असा विश्वासही अखिलेश यांनी या वेळी व्यक्त केला.

ही निवडणूक राज्याचे भाग्य बदलेल - अमित शहा
आंबेडकरनगर - उत्तर प्रदेश विधानसभेसाठी सुरू असलेली निवडणूक राज्याचे नशीब बदलणारी असून, कॉंग्रेस व समाजवादी पक्षांत झालेली आघाडी म्हणजे दोन भ्रष्ट कुटुंबांत झालेला समेट असल्याचा आरोप भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला. एका पक्षाला दुसऱ्या पक्षाच्या बदल्यात सत्ता सोपविणे याला केवळ निवडणूक म्हणता येणार नाही, तर याद्वारे राज्याचे भाग्य बदलण्याची संधी जनतेला मिळते. अखिलेश यादव व राहुल गांधी या दोन राजपुत्रांची गोष्टच निराळी असून, एक आपल्या आईला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ देतो, तर दुसरा आपल्या पित्याच्या विरोधात कारवाया करतो. येथील जनतेला याची काळजी आहे. अशी टिप्पणीही शहा यांनी केली आहे.

Web Title: Mayawati would align hands with BJP