पाकमध्ये भारतीय सुनेचा छळ; मदतीला परराष्ट्रमंत्री

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मार्च 2017

काही दिवसांपूर्वी तिने भारतात कुटुंबीयांना संपर्क करून भारतीय असल्याने पती आणि सासरच्यांकडून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचे सांगितले.

नवी दिल्ली : भारतीय असल्याने पाकिस्तानात सासरच्यांकडून छळ होत असलेल्या एका महिलेच्या मदतीसाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाऊले उचलत पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले.

सुषमा स्वराज यांनी केलेल्या ट्विटमध्ये सांगितले की, 'महंमद अकबर या व्यक्तीचा मला संदेश मिळाला आहे की त्यांच्या मुलीचा पाकिस्तानात तिच्या सासरच्यांकडून छळ केला जातोय. पाकिस्तानातील भारतीय उच्चालयातील अधिकाऱ्यांना त्या महिलेच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महंमदिया बेगम ही मूळची हैदराबाद येथील महिला काही वर्षांपूर्वी पाकिस्तानातील एका व्यक्तीशी लग्न करून पाकिस्तानात स्थायिक झाली होती. काही दिवसांपूर्वी तिने भारतात कुटुंबीयांना संपर्क करून भारतीय असल्याने पती आणि सासरच्यांकडून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचे सांगितले. त्यानंतर तिचे वडील महंमद अकबर यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहीती दिली. 

सुषमा स्वराज यांच्या आदेशानंतर पाकिस्तानातील भारतीय अधिकाऱ्यांनी या महिलेची भेट घेउन संपूर्ण माहिती घेतली. या अधिकाऱयांकडे तिने भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर सुषमा स्वराज यांनी भारतीय उच्चायुक्तालयाला त्यांना भारतात पाठवण्याची व्यवस्था करण्याबाबतचे आदेश दिले. 
 

Web Title: MEA sushma swaraj run to help tortured Indian woman in pakistan