कत्तलखाना बंदीविरुद्ध मटण समितीचा बेमुदत संप

वृत्तसंस्था
रविवार, 26 मार्च 2017

बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या कत्तलखान्यांवर बंदी आणण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ लखनौतील चिकन आणि मटण मंडी समितीने बेमुदत संप पुकारला आहे.

लखनौ (उत्तर प्रदेश) - बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या कत्तलखान्यांवर बंदी आणण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ लखनौतील चिकन आणि मटण मंडी समितीने बेमुदत संप पुकारला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 22 मार्च रोजी बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या कत्तलखान्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच गायीच्या तस्करीवर संपूर्ण बंदी आणण्याचे निर्देशही पोलिसांना दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर लखनौतील चिकन आणि मटण मंडी समितीने बेमुदत संप पुकारला आहे. बेकायदा कत्तलखान्याच्या नावावर सरकार लहान व्यावसायिकांना त्रास देत असल्याची तक्रार समितीने केली आहे. मटण विक्रेत्यांनी त्यांची रेस्टॉरंट आणि हॉटेल्स बंद ठेवावीत, असे आवाहनही समितीने केले आहे. सरकारने जर काही पर्यायी व्यवस्था उभी केली नाही, तर दुकाने बंदच राहतील, असा इशाराही दिला आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षाने आपल्या निवडणूक जाहीनाम्यात राज्यात बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या सर्व कत्तलखान्यांवर बंदी आणण्याचे म्हटले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही निवडणूक प्रचारसभेत याबाबत ही भूमिका जाहीर केली होते.

Web Title: Meat committee goes on indefinite strike against slaughter house ban