जगणं महाग; औषधांच्या किमती १० टक्क्यांनी वाढणार

देशातील महागाईच्या झळा अधिक तीव्र झाल्या असून दैनंदिन वापरातील जीवनावश्यक औषधांच्या किमतीही वाढणार आहेत.
Medicines
MedicinesSakal

मुंबई-नवी दिल्ली : देशातील महागाईच्या झळा अधिक तीव्र झाल्या असून दैनंदिन वापरातील जीवनावश्यक औषधांच्या किमतीही वाढणार आहेत. पॅरासिटोमॉल व मेट्रोनिडाझोल यासह आठशे औषधांच्या किमती एप्रिलपासून वाढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘शेड्यूल ड्रग्ज’ श्रेणीत येणाऱ्या या औषधांच्या किमती किमान १० टक्क्यांनी वाढविण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. साहजिकच सर्वसामान्य माणसाला कोरोनासह अनेक रोगांवरील औषधोपचार घेण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागतील.

पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुका संपताच उसळलेल्या महागाईच्या ज्वाळांनी पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅस पाठोपाठ आता औषधांनाही वेढा घातला आहे. येत्या एप्रिल महिन्यापासून ८०० औषधे महागणार असून त्यात साध्या तापापासून कोरोना, ह्रदयरोग, उच्च रक्तदाब, त्वचारोग, ॲनिमिया, कर्करोग आदींवरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा समावेश आहे. पॅरासिटोमॉल, फिनाइटोइन, सोडियम, मेट्रोनिडाझोल यासारख्या पेनकिलर औषधांच्या किमती वाढणार आहेत.

असे ठरणार दर

सामान्य आजारापासून ते गंभीर स्थितीतील रुग्णांवरील उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधे महाग होणार आहेत. आता औषधांचे देशांतर्गत दर ठोक महागाई दराच्या (डब्ल्यूपीआय) आधारे निश्चित करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय औषध किंमतनिर्धारण प्राधिकरणाने (एनपीपीए) स्पष्ट केले आहे. कोरोनाची महासाथ व त्यानंतरच्या काळात आवश्यक औषधांच्या किमती वाढविण्याची मागणी फार्मास्युटिकल उद्योगाकडून होते आहे.

केंद्र सरकारच्या संमतीनेच

औषधांच्या किमतीमध्ये १०.७ टक्क्यांनी वाढ करण्यास केंद्राने हिरवा कंदील दाखविला आहे. औषधांच्या किमतीवर सरकारचे नियंत्रण असते. म्हणजे त्यांच्या किमतीत वाढ करण्याआधी सरकारची परवानगी घेणे बंधनकारक असते. दरम्यान मागील दोन वर्षांत अनेक औषधांच्या किमती आधीच प्रचंड वाढल्या आहेत. यात पॅरासिटोमॉल (१३० टक्के) सिरप (पातळ औषधे) व ‘ड्रॉप’साठी वापरण्यात येणारे ग्लिसरीन (२६३ टक्के), पॉपिलॉन ग्लायकोल (८३ टक्के) आदींचा त्यात समावेश आहे.

या दरवाढीचा फटका थेट रुग्णांना बसणार आहे. घाऊक किमतीत १० टक्के वाढ झाली आहे. ऑनलाइन फार्मसी आणि खासगी मेडिकल स्टोअर रुग्णाला औषधांवर १० ते १५ टक्के डिस्काऊंट देत असतात; परंतु आता घाऊक किमतीत वाढ झाल्याने त्यांच्याही खरेदी किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता डिस्काउंट बंद होईल.

- अभय पांडे, अध्यक्ष ‘ऑल फूड अॅंड ड्रग्ज लायसन्स होल्डर्स फाउंडेशन’

अशी होईल दरवाढ

ज्या घाऊक विक्रेत्याला एखादी पॅरासिटोमॉल १ रुपयाला मिळायची, ती आता त्याला १ रुपये १० पैशांना मिळेल. हीच पॅरासिटोमॉल किरकोळ विक्रेत्याकडे १ रुपये १५ पैशांना येणार आहे त्यामुळे, खरेदी आणि विक्रीवर याचा परिणाम होईल. एमआरपी वाढल्याचा थेट परिणाम औषधे खरेदी करणाऱ्या रुग्णांवर होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com