‘दक्षिणायना’चा आता दुसरा अध्याय

तब्बल १८ वर्षांनंतर हैदराबादेत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे आयोजन
meeting of  National Executive of BJP held for two days from tomorrow in Hyderabadn Telangana after 18 years 2024 election strategy
meeting of National Executive of BJP held for two days from tomorrow in Hyderabadn Telangana after 18 years 2024 election strategy sakal

नवी दिल्ली : केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक तेलंगणची राजधानी हैदराबादमध्ये उद्यापासून (ता. २) दोन दिवस होणार आहे. या वर्षातील विधानसभा लढती व २०२४ ची लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील प्रमुख पक्षनेत्यांना ‘विजयाचा मंत्र’ या निमित्ताने देतील. हिंदी लादण्याच्या प्रयत्नांना कडाडून विरोध करणारी दाक्षिणात्य राज्ये मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा अश्वमेध अडविण्यात गेली आठ वर्षे आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजपने त्याकडे लक्ष वळविले असून तेलंगणाच्या मार्गाने दक्षिणायन मोहिमेवर भाजप उतरणार हे स्पष्ट आहे. तब्बल १८ वर्षांच्या खंडानंतर हैदराबादमध्ये भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी होत आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी विधानसभेची रणधुमाळी होणाऱ्या १८ राज्यांतील तयारीला भाजपने याआधीच वेग दिला आहे. या राज्यांतील तयारीबाबत संबंधित पक्षाध्यक्ष हैदराबाद बैठकीत पक्षनेतृत्वासमोर सादरीकरण करतील. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भाषणाने कार्यकारिणीचे उद्‍घाटन होईल व पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाने समारोप होईल. त्यानंतर रविवारी सायंकाळी हैदराबादेत होणाऱ्या मोदींच्या सभेसाठी दहा लाख लोक जमविण्याचा भाजपचा निर्धार आहे. तेलंगणात भाजपच्या सभेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक जमणे हाही चमत्कार ठरेल. मोदी या सभेतील भाषणात राजकारणातील घराणेशाहीचे उच्चाटन, आपली संस्कृती व वारसा यांची जपणूक करणे या मुद्यांवर भर देण्याची चिन्हे आहेत. यावेळी तेलुगू कवींच्या व संतांच्या काही काव्यपंक्तीही ते उद्‍धृत करतील.

भीमावरमला कार्यक्रम

भाजपची आंध्र प्रदेशावरही नजर आहे. हैदराबादची बैठक संपताच पंतप्रधान मोदी चार जुलै रोजी भीमावरम येथे जाऊन स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या १२५ व्या जयंती कार्यक्रमांचे उद्‍घाटन करतील. यापूर्वी डाव्यांचे एकछत्र असलेल्या त्रिपुराचा गड सर करण्याची रणनीती यशस्वी करणारे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील देवधर यांना भाजपने जगनमोहन रेड्डी यांच्या आंध्रात उतरविले आहे.

आता १६ राज्यांत सत्तेवर

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून गेल्यावर शिवसेना बंडखोरांसह सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपची सत्ता असलेल्या राज्ये-केंद्रशासित प्रदेशांची एकूण संख्या १६ वर पोचली आहे. सत्तेत नसतानाही सत्ता खेचून आणण्याचे लक्ष्य भाजप नेतृत्वाने साध्य केलेले महाराष्ट्र हे कर्नाटक व मध्य प्रदेश यानंतरचे तिसरे राज्य ठरले आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा हरियाना, मध्य प्रदेश, कर्नाटक, आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश व मणिपूर मध्ये भाजप स्वबळावर सत्तेत असून बिहार, नगालॅंड, मेघालय व पुदुचेरी या चार ठिकाणी मित्रपक्षांसह भाजपकडे सत्तेची सूत्रे आहेत.

तेलंगणावर लक्ष

के रळ जिंकणे तूर्त अवघड असल्याचे संघपरिवाराच्या लक्षात आल्यावर भाजपने तेलंगण व नंतर आंध्र प्रदेशाकडे लक्ष वळविले आहे. कर्नाटकातील भाजपच्या विजयाला दक्षिण दिग्विजय म्हटले गेले पण, भाजपचे ‘मिशन साऊथ’ तेथेच अडकून पडले. शिवाय येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा विजय हा मोदीयुग सुरू होण्याआधीचा होता. आता तेलंगणात मुदतीआधी विधानसभा निवडणुका घेण्याचा डाव केसीआर पुन्हा खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच तेथे भाजपने जोर लावला आहे. राज्याच्या सर्व ११९ विधानसभा मतदारसंघांचा मुक्कामी दौरा करण्याचे निर्देश पक्षनेतृत्वाने भाजपचे तमाम खासदार, मंत्री व आमदारांना दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com