
Meghalaya Election 2023: स्थिर सरकारसाठी संगमा काँग्रेससोबत जाणार? एक्झिट पोलमध्ये स्पष्ट बहुमत नाही
शिलांगः मेघालय हे ६० विधानसभा सदस्य असलेलं राज्य आहे. सत्तेत येण्यासाठी ३१ जागांचं बहुमत लागतं. परंतु एक्झिट पोलमध्ये कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्री संगमा यांनी पर्याय खुले असल्याचं विधान केलं आहे.
मेघालयामध्ये भाजप, काँग्रेस, एनपीपी आणि तृणमूल काँग्रेससह १३ राजकीय पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहेत. एकूण ३७५ उमेदवार नशिब आजमावत आहेत.
यामध्ये ३६ महिला उमेदवार आहेत. भाजप आणि काँग्रेसने या निवडणुकीत ६०-६० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. तर तृणमूल काँग्रेसने ५६ उमेदवारांना तिकीट दिलंय.
याशिवाय सीएम कोनराड के. संगमा यांच्या नेतृत्वातील एनपीपीने ५७ उमेदवार, यूडीपीपेने ४६ उमेदवार, एचएसपीडीपीने ११, पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंटने ९, गण सुरक्षा पार्टीने १, गारो नॅशनल पक्षाने दोन, जनता दल (युनायटेड)ने तीन उमेदवार उभे केले आहेत.
मेघालयामध्ये एका जागेवरील उमेदवाराचा मृत्यू झाल्याने ५९ जागांवरच निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे निकालसुद्धा ५९ जागांवरच लागेल.सरकार बनवण्यासाठी ३१ सदस्य गरजेचे आहेत.
मेघालयातील मतदानानंतर जे एक्झिट पोल आले त्यामध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्री संगमा यांनी युतीचे संकेत दिले आहेत. संगमा म्हणाले की, स्थिर सरकार बनवण्यासाठी आम्ही सर्व पर्याय खुले ठेवणार आहोत.
रुझान आमच्या बाजूने आहेत, त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. मागच्या वेळीपेक्षा यावेळी आम्हाला जास्त जागा मिळतील, असा विश्वास आहे. असं असलं तरी राज्याचं हीत लक्षात घेऊन सरकार स्थापनेचा निर्णय घेतला जाईल. संगमा हे काँग्रेससोबत जावू शकतात, असं राजकीय जाणकार सांगत आहेत.