लैंगिक शोषण:"मेघालय'च्या राज्यपालांचा राजीनामा

पीटीआय
शुक्रवार, 27 जानेवारी 2017

राज भवनामधील कर्मचाऱ्यांनी राज्यपालांच्या वर्तनाबद्दल तीव्र निषेध व्यक्त करत त्यांना हटविण्याची मागणी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे केली होती

शिलॉंग - मेघालय राज्यातील राज भवनमधील कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषणाचा आरोप केल्यामुळे अडचणीत आलेले राज्यपाल व्ही शण्मुगनाथन यांनी अखेर काल (गुरुवार) रात्री पदाचा राजीनामा दिला. शण्मुगनाथन यांचे वर्तन हे राज्यपाल कार्यालयाच्या प्रतिष्ठेस काळिमा फासणारे असल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली होती.

या प्रकरणी पंतप्रधान व गृह मंत्रालयाकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकेची प्रतीक्षा करत असल्याचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री मुकुल संगमा यांनीही दिले होते. या पार्श्‍वभूमीवर, शण्मुगनाथन यांनी पदाचा राजीनामा दिला.

राज भवनामधील कर्मचाऱ्यांनी राज्यपालांच्या वर्तनाबद्दल तीव्र निषेध व्यक्त करत त्यांना हटविण्याची मागणी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे केली होती. ""राज्यपालांनी राज भवनाचे रुपांतर तरुण महिलांच्या क्‍लबमध्ये केले आहे. राज भवनमध्ये राज्यपालांच्या थेट आदेशानुसार ये-जा करणाऱ्या तरुणींची संख्या वाढली आहे. या तरुणींपैकी कित्येक जणींना राज्यपालांच्या शयनगृहामध्येही प्रवेश आहे,'' अशा शब्दांत या कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला होता.

याचबरोबर, शण्मुगनाथन यांना हटविण्याच्या मागणीसाठी येथील महिला कार्यकर्त्यांनी मोहिमही राबविण्यास सुरुवात केली होती.

Web Title: Meghalaya Governor V. Shanmuganathan resigns