'...तर भारताचा झेंडा हाती राहणार नाही' : मेहबुबा मुफ्ती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

कलम 370 हटविल्यास भारताचा झेंडा आणि भारतीयत्त्व याबद्दल विचार करावा लागेल, असे वक्तव्य मेहबुबा मुफ्ती यांनी केले आहे. 

सध्या देशात लोकसभा निवडणूकीचे वादळ आले आहे. आरोप-प्रत्यारोप आणि जनतेचे मन वळविण्यासाठी त्यांच्या गरजांबाबत खोटी आश्वासने दिली जातात. यातच बेताल वक्तव्यांचे सत्रही सुरु होते. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि एकेकाळी भाजपच्या मित्रपक्ष असलेल्या मेहबुबा मुफ्ती यांनीही असेच वक्तव्य केले आहे. तसेच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनाही खुले आव्हान दिले आहे.   

कलम 370 बाबत मुफ्ती यांनी खुली धमकी दिली आहे आणि म्हटले की, 'जर जम्मू काश्मीर मध्ये कलम 370 सोबत छेडछाड केली तर देशाचा तिरंगा आमच्या हातीही राहणार नाही आणि खांद्यावर राहणार नाही.' 

पुढे त्या म्हणाल्या, '370 जम्मू काश्मीर आणि भारत यांच्यामधील पुल आहे. हे कलम हटविले तर मला भारतीय असण्याबद्दल विचार करावा लागेल. आतापर्यंत भारताचा झेंडा पकडला आहे. पण 370 ला हात लावल्यास झेंडा ना हाती राहील, ना खांद्यावर लावला जाईल.'

मुफ्ती यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना आव्हान देत म्हणाल्या, 'अमित शहा यांना मला सांगायचे आहे की, तुम्ही मुंगेरी लाल चे स्वप्न बघत आहात. कलम 370 संपवावे हे असेच एक स्वप्न. 370 जम्मू काश्मीर आणि भारत यांच्यामधील पुल आहे. जेव्हा तुम्ही या पुलाला तोडाल तेव्हा माझ्यासारखी मुख्य प्रवाहातील राजकारणी जी भारताच्या धरतीची शपथ घेते, तर भारतीय असण्याबद्दल मला विचार करावा लागेल.'

Web Title: Mehbooba Mufti challenged the BJP president Amit Shah