प्रत्येक काश्‍मिरी तरुण दगडफेक करणारा नाही

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 मे 2017

गेल्या दोन महिन्यांपासून काश्‍मीर खोऱ्यात सुरक्षा यंत्रणांच्या विरोधात वातावरण असून, यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आजही पुलवामा जिल्ह्यात विद्यार्थी आणि सुरक्षा दलामध्ये पुन्हा चकमक उडाली. त्या पार्श्‍वभूमीवर मेहबूबा मुफ्ती यांनी हा दावा केला. 

श्रीनगर : काश्‍मीर पुन्हा रस्त्यावर आला आहे; मात्र प्रत्येक काश्‍मिरी तरुण हा दगडफेक करणारा नाही, असा दावा जम्मू- काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज केला आहे. 

गेल्या दोन महिन्यांपासून काश्‍मीर खोऱ्यात सुरक्षा यंत्रणांच्या विरोधात वातावरण असून, यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आजही पुलवामा जिल्ह्यात विद्यार्थी आणि सुरक्षा दलामध्ये पुन्हा चकमक उडाली. त्या पार्श्‍वभूमीवर मेहबूबा मुफ्ती यांनी हा दावा केला. 

पुलवामा येथील नागरी सचिवालयाच्या उद्‌घाटनाच्या वेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. काश्‍मीर खोऱ्यात लवकरच शांतता निर्माण होईल, असा आशावाद व्यक्त करून त्या म्हणाल्या, ''काहीजण दगडफेक करणारे आहेत. मात्र, प्रत्येक काश्‍मिरी तरुणाकडून ती केली जात नाही. प्रसिद्धी माध्यमांनीही राज्याच्या विकासाला बाधा पोचेल अशा पद्धतीने काश्‍मिरी लोकांचे चित्र रंगवू नये. काश्‍मिरी विद्यार्थ्यांचा मनोभंग झाल्याने ते संतप्त झाले आहेत. काही विद्यार्थ्यांना भडकावण्यात आले आहे, तर काहींना भडकावण्यात येत आहे. परिस्थिती बिकट आहे. मात्र, यातून मार्ग निघणार नाही, असे मला वाटत नाही. आपण एकत्र येऊन या परिस्थितीतून मार्ग काढला पाहिजे.'' 

जम्मू-काश्‍मीर हा भारताचा 'आत्मा' 
जम्मू आणि काश्‍मीर हा भारताचा 'आत्मा' आहे आणि भारत हा तुमचा असल्याचे मेहबूबा मुफ्ती यांनी लोकांना आवाहन करताना म्हटले. जेथे जम्मू आणि काश्‍मीर आहे, तेथे भारत आहे. जम्मू आणि काश्‍मीरच्या लोकांचा केवळ जम्मू आणि काश्‍मीरवरच नव्हे, तर देशाच्या प्रत्येक भागावर हक्क असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. जम्मू आणि काश्‍मीरच्या तरुणांनी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आणि खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. 'तुम्हा तरुणांकडे भरपूर क्षमता असून, देशाच्या कोणत्याही ठिकाणी असलात तरी ती सिद्ध करा,' असे आवाहन त्यांनी तरुणांना केले.

Web Title: Mehbuba Mufti says, not every Kashmiri youth is stone pelter