तुमच्या आधारकार्डची सुरक्षा वाऱ्यावर?

योगेश कानगुडे
शनिवार, 17 मार्च 2018

‘द क्ंविट’ आणि ‘मनी लाइफ’च्या बातमीनुसार ‘mera aadhaar meri pehchan filetype pdf’ असं गुगलवर सर्च केल्यानंतर काही जणांचे आधार तपशील दिसत आहे. यात आधार धारकाचं नाव, आधार क्रमांक, पालकांचं नाव, पत्ता, जन्म तारीख, छायाचित्र हे तपशील उपलब्ध आहेत.

एकीकडे प्रत्येक गोष्टीसाठी आधारकार्डची सक्ती करण्यात येत आहे. तर दुसरीकडे त्याच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण केले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच mAadhaar हे अॅप सहज हॅक करणं शक्य असल्याचं तज्ज्ञांनी दाखवून दिले आहे. दोन दिवसांपूर्वीच फ्रेंच सायबर सुरक्षा संशोधकानं UIDAI च्या अॅपमधल्या महत्त्वाच्या त्रुटी दाखवून दिल्या होत्या. ही घटना ताजी असतानाच आता आधारमधील नागरिकांची माहिती सहज इंटरनेटवर लीक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘मेरा आधार, मेरी पहचान’ असं गुगलवर सर्च केल्यानंतर काही व्यक्तिंच्या आधारकार्डांचे तपशील समोर येत असल्याचं काही लोकांच्या लक्षात आलं. यामुळे पुन्हा एकदा आधार कार्डमधील माहितीच्या गोपनीयतेवर शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. 

‘द क्ंविट’ आणि ‘मनी लाइफ’च्या बातमीनुसार ‘mera aadhaar meri pehchan filetype pdf’ असं गुगलवर सर्च केल्यानंतर काही जणांचे आधार तपशील दिसत आहे. यात आधार धारकाचं नाव, आधार क्रमांक, पालकांचं नाव, पत्ता, जन्म तारीख, छायाचित्र हे तपशील उपलब्ध आहेत. नशिबाने या कार्डधारकांचे  बायोमेट्रीक्स डिटेल्स उपलब्ध नसल्यानं ही तितकी चिंतेची बाब नाही. गुगल सर्चमध्ये ‘mera aadhaar meri pehchan filetype pdf’ असा शब्द सर्च केल्यानंतर स्टार कार्ड या वेबसाईटचं नाव प्राधान्य क्रमानं येत असल्याचं ‘मनी लाईफ’नं म्हटलं आहे. यात ज्या आधार कार्डधारकांचे तपशील सुरूवातीला दिसत आहे ते आधार कार्डधारक प्रामुख्यानं उत्तर प्रदेश, बिहारमधले आहेत. स्टार कार्डशिवाय एका सरकारी संकेतस्थळावर तसेच फुटबॉल फेडरेशनच्या संकेतस्थळावरदेखील आधार कार्डचे तपशील उपलब्ध असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे ज्यांच्या आधार कार्डचे तपशील इंटरनेटवर उपलब्ध आहेत त्यांना याची कल्पना आहे का? हे तपशील कसे उपलब्ध झाले? तपशील उपलब्ध करण्याआधी त्यांची परवानगी घेण्यात आली होती का? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहे.

adharcard

काही दिवसांपूर्वी फ्रेंच सायबर सुरक्षा संशोधक रॉबर्ट बॅपटिस्ट यांनी mAadhaar अॅप हे केवळ एका मिनिटांत हॅक होऊ शकतं असा दावा केला होता. mAadhaar अॅपमध्ये कार्डधारकांचे तपशील उपलब्ध असल्यानं कार्डधारकाला प्रत्येकवेळी स्वत:सोबत कार्ड ठेवण्याची गरज भासत नाही. पण सुरक्षेच्या दृष्टीनं या अॅपची प्रणाली पूर्णपणे फोल असल्याचा दावा करून रॉबर्ट बॅपटिस्ट यांनी ट्विटरवर खळबळ माजवली होती. बँक खाते, मोबाईल तर अन्य सेवांचा लाभ घेण्यासाठी आधारसक्ती सरकारकडून करण्यात आली आहे. त्यातून आधारचे तपशील उपलब्ध असल्यानं आता पुन्हा एकदा आधारच्या सुरक्षेबाबात प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

काही दिवसांपूर्वीच अवघ्या पाचशे रुपयांत आधारच्या माहितीसाठय़ाचा कसा चोरी करता येतो, हे द ट्रिब्यून या वर्तमानपत्राच्या पत्रकाराने उदारणासहित  दाखवून दिले होते. आधार त्रुटीदर्शन काही पहिल्यांदाच झाले आहे असे नाही. याआधी देशातील सहा अत्यंत ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी आधारसंदर्भात सरकारला सविस्तर पत्र लिहून या यंत्रणेचे तोटे, तिच्या अंमलबजावणीतील कमतरता आणि धोके दाखवून दिले आहेत. आधार हाताळणाऱ्या यंत्रणेनेच या संदर्भात दिलेल्या आकडेवारीनुसार यातील गैरव्यवहारांची तब्बल ४० हजार इतकी प्रकरणे नोंदविण्यात आली असून त्याबाबतच्या तक्रारी चौकशीच्या विविध पातळ्यांवर आहेत. याचा अर्थ आधार म्हणजे सारे काही सुरळीत, पवित्र आणि उत्तम असे मानावयाचे कारण नाही.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mera Aadhaar Meri Pehchan: But Leaked All Over the Internet!

टॅग्स