#MeToo निहारिकाच्या गौप्यस्फोटामुळे नवाझ अडचणीत

#MeToo निहारिकाच्या गौप्यस्फोटामुळे नवाझ अडचणीत

मुंबई : सोशल मीडियात सुरू झालेल्या "मी टू'च्या वादळाने पुन्हा एकदा सिनेसृष्टी हादरली. कधीकाळची "मिस इंडिया' आणि अभिनेत्री निहारिका सिंह हिने नवाझुद्दीन सिद्दीकी, साजिद खान आणि भूषणकुमार यांच्यासोबत काम करताना आलेले अनुभव सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

"मिस लव्हली' या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेल्या निहारिकाने संध्या मेनन या महिला पत्रकाराच्या ट्विटर अकाउंटवरून हे अनुभव सांगितले आहेत. आतापर्यंत रूपेरी जगतामध्ये वावरताना आपल्याला विविध प्रकारच्या शोषणाला सामोरे जावे लागले असल्याचे सांगत, निहारिकाने खरी लढाई ही आपण पुन्हा एकदा मुंबईत येण्याचा निर्णय घेतल्यावर सुरू झाल्याचे म्हटले आहे. 

"मिस इंडिया'चा किताब मिळवल्यानंतर राज कन्वर यांनी निहारिकाला चित्रपटातून लॉंच करण्याचा निर्णय घेतला होता; पण हा प्रोजेक्‍टदेखील गुंडाळला गेल्याने टी सीरिजच्या भूषणकुमार यांनी तिला काम देण्याचा निर्णय घेतला. यानंतर भूषणकुमार यांनी मला त्यांच्या कार्यालयामध्ये बोलावून घेतले. या वेळी त्यांनी मला एक पाकीट दिले, त्यात पाचशेच्या नोटांचा समावेश होता. यानंतर मध्यरात्री त्यांनी मला मेसेज केला, यामध्ये त्यांनी दोघांनी काहीकाळ एकत्र राहावे असे मत मांडले होते.

यावर मी त्यांना "डबल डेट'चा पर्याय दिला. तुम्ही तुमच्या पत्नीला आणा, मी माझा बॉयफ्रेंड सोबत घेऊन येते, असा रिप्लाय मी त्यांना दिला. यानंतर त्यांनी मला कधीच मेसेज पाठविला नाही, असे निहारिकाने म्हटले आहे. यानंतर चित्रपटालाही विलंब झाला आणि मला केलेल्या कामाचे पैसेही मिळाले नाहीत, असेही तिने स्पष्ट केले. 

नवाझने मिठी मारली 

नवाझबाबतचा अनुभव सांगताना निहारिकाने म्हटले आहे की, ""मिस लव्हली या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान माझी नवाझशी भेट झाली होती, एकदा नवाझ रात्रभर शूटिंग करत होता. त्यानंतर सकाळी त्याने मी तुझ्या घराजवळ असल्याचे सांगितले. मी त्याला नाश्‍त्यासाठी घरी बोलावले, जेव्हा मी घराचा दरवाजा उघडला तेव्हा नवाझने बळजबरीने मिठी मारली. मी त्याला दूर सारण्याचा प्रयत्न केला; पण माझा प्रयत्न तोकडा पडला. मला नवाझसोबत संबंध ठेवण्याची इच्छा नव्हती.''  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com