निमलष्करी जवानांवर 'सोशल मीडिया बंदी' 

वृत्तसंस्था
रविवार, 15 जानेवारी 2017

​लष्करातील जवानांमध्ये शिस्त राखली जावी, यासाठी गृहमंत्रालयाने दिशानिर्देश जारी केले आहेत. मात्र, व्यक्तिगत पोस्ट करण्यास कोणतीही बंदी नाही. 
- किरण रिज्जू, केंद्रीय गृहराज्यमंत्री 

नवी दिल्ली - सोशल मीडियावर बीएसएफ जवानाचा व्हिडिओ "व्हायरल' झाल्यानंतर देशभर खळबळ माजली असतानाच, लष्करातील शिस्त अबाधित राखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने दिशानिर्देश जारी केले आहेत. निमलष्करी दलाच्या जवानांना सोशल मीडियाचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

विशेष म्हणजे जवानांच्या काही तक्रारी असल्यास थेट मला सांगा, असे आवाहन काल (शुक्रवारी) लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केल्यानंतर गृहमंत्रालयाने जवानांच्या सोशल मीडियावरील वापराला चाप लावला आहे. बीएसएफच्या तेज बहादूर यादव या जवानाने जवानांना निकृष्ट जेवण दिले जात असल्याची व्यथा मांडणारा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. या व्हिडिओनंतर एकच खळबळ उडाली होती. याबाबत चौकशी करण्याचे आदेशही पंतप्रधान कार्यालयाने गृहमंत्रालयाला दिले होते. तसेच अहवालही मागवला होता. मात्र, यादव याच्या तक्रारीत काहीही तथ्य नाही, असा अहवाल गृहमंत्रालयाने दिला होता.

याशिवाय शुक्रवारी नवनियुक्त लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी जवानांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी थेट मला सांगावे, असे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला काही तास उलटत नाहीत तोच केंद्रीय गृहमंत्रालयाने नवीन दिशानिर्देश जारी करत, निमलष्करी दलातील जवानांच्या सोशल मीडियाच्या वापराला बंदी घातली आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. नव्याने जारी केलेल्या दिशानिर्देशांनुसार, कोणत्याही जवानाला विनापरवानगी छायाचित्र अथवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करता येणार नाही. जर एखाद्या जवानाला ट्विटर, फेसबुक, व्हॉट्‌सऍप, इंस्टाग्राम यांसारख्या सामाजिक माध्यमांच्या मंचावर छायाचित्र अथवा व्हिडिओ टाकायचा असल्यास संबंधित दलाच्या महासंचालकांकडून परवानगी घ्यावी लागेल. 

स्मार्ट फोनवर बंदी नाही : लष्करप्रमुख 
जवानांच्या स्मार्ट फोनच्या वापरावर बंदी घालण्याचा लष्कर गांभीर्याने विचार करत असल्याचे वृत्त फेटाळताना असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी स्पष्ट केले आहे. पूर्वी आम्हाला आमच्या कुटुंबापर्यंत पोचण्यासाठी पत्रांवर अवलंबून राहावे लागत होते आणि ही पत्रे पोचायला 7 ते 15 दिवस लागत होते. मात्र, मोबाईल फोन्समुळे चित्र पूर्णपणे बदलले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: MHA banned army from using smartphones