ऐन हंगामात नागरिकांचे स्थलांतर वाढण्याची भीती

ऐन हंगामात नागरिकांचे स्थलांतर वाढण्याची भीती

यूएनआय
सोमवार, 22 मे 2017

भारत- पाकिस्तान या दोन देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीचा फटका सीमारेषेनजीकच्या गावांना बसत आहे. सामान्य नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, अनेक जण सुरक्षित ठिकाणी धाव घेत आहेत. विशेषतः जम्मू, सांबा, कथुआ या जिल्ह्यांतील गावांमधील नागरिक दहशतीच्या छायेखाली वावरत आहेत.

जम्मू - सीमेपलीकडून सातत्याने होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन पाहता जम्मूतील सीमारेषेनजीक असणाऱ्या गावांमधून अनेक कुटुंबे स्थलांतर करत आहेत. यामध्ये बहुतांशी शेतकरी कुटुंबांचा समावेश असून, ऐन हंगामात या स्थलांतरात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.

भारत- पाकिस्तान या दोन देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीचा फटका सीमारेषेनजीकच्या गावांना बसत असून, अशातच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन होत आहे. यामुळे आतापर्यंत 1700 कुटुंबांतील सुमारे 4 हजार नागरिकांनी नौशेरा येथील छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. सामान्य नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, अनेक जण सुरक्षित ठिकाणी धाव घेत आहेत. विशेषतः जम्मू, सांबा, कथुआ या जिल्ह्यांतील गावांमधील नागरिक दहशतीच्या छायेखाली वावरत आहेत.

लष्कराने पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये "सर्जिकल स्ट्राइक' करून उरी हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर येथील परिस्थिती चिघळली आहे. सध्या या भागात पीक काढणीचा हंगाम सुरू असून, या पार्श्वभूमीवर होणाऱ्या स्थलांतरामुळे चिंता व्यक्त होत आहे. याचा परिणाम विवाह समारंभांवरही झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

शेतकऱ्यांच्या समस्या
पाकिस्तानकडून केव्हाही तोफगोळ्यांचा मारा होत असल्याने रोजाने काम करणारे मजूर शेतात येण्यास धजावत नाहीत. पीक काढून त्याची विक्री न झाल्यास त्यासाठी घेतलेले कर्ज फेडता येणार नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

शेतात उभे असलेले पीक काढणीला आले असून, ते आम्हाला काढता येत नाही. सीमेवरील तणावामुळे आमच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
- गुरू सिंह, शेतकरी

सर्जिकल स्ट्राइकनंतरच्या घडामोडी
- 286 गोळीबाराच्या घटना
- 26 नागरिकांचा मृत्यू
- 14 सुरक्षा कर्मचारी हुतात्मा

Web Title: Migration to increase?