लष्कराच्या जवानाला मारणारा दहशतवादी चकमकीत ठार

वृत्तसंस्था
रविवार, 19 मे 2019

जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे आज पहाटे सुरक्षा रक्षकांनी हिज्बुल मुजाहिदीनच्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले. मारल्या गेलेल्यांमध्ये भारतीय लष्करातील जवान औरंगजेब याला गेल्या वर्षी मारणाऱ्या दहशतवाद्याचाही समावेश आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे आज पहाटे सुरक्षा रक्षकांनी हिज्बुल मुजाहिदीनच्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले. मारल्या गेलेल्यांमध्ये भारतीय लष्करातील जवान औरंगजेब याला गेल्या वर्षी मारणाऱ्या दहशतवाद्याचाही समावेश आहे.

गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर सुरक्षा रक्षकांनी पुलवामामधील अवंतीपुरा येथे आज पहाटेपासून शोधमोहीम सुरू केली होती. शोध सुरू असतानाच लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात तीन दहशतवादी मारले गेले. शौकत दार, इरफान वार आणि मुजफ्फर शेख अशी या दहशतवाद्यांची नावे असून तिघेही स्थानिक आहेत. लष्कराच्या प्रवक्‍त्याने दिलेल्या माहितीनुसार, हे तिघेही जण हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे सदस्य असून त्यांच्यावर सुरक्षा दलांवर हल्ले, नागरिकांवर हल्ले आणि विविध दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असे आरोप होते.

2018 मध्ये जवान औरंगजेब आणि पोलिस कर्मचारी अकीब अहमद वागाय यांना मारणाऱ्या दहशतवाद्यांच्या गटात शौकत दार याचा समावेश होता. औरंगजेब याचे अपहरण करून नंतर हत्या करण्यात आली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A militant killed in the encounter