आसाम, मणिपूरमध्ये स्फोट; जीवितहानी नाही

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 जानेवारी 2017

या स्फोटांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली; तरी दहशतवाद्यांनी केवळ त्यांचा प्रभाव जाणवून देण्यासाठी हे स्फोट घडविले असल्याचे मत एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे

दिसपूर - भारताच्या 68 व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा केला जात असतानाच मणिपूर व आसाम या राज्यांमध्ये अतिरेक्‍यांनी नऊ स्फोट घडविल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. या स्फोटांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मणिपूर येथे दोन तर आसाममध्ये सात स्फोट घडविण्यात आले आहेत.

आसाममधील चरैदो जिल्ह्यात तीन, शिवसागर जिल्ह्यात दोन; तर तिनसुखिया व दिब्रुगढ या जिल्ह्यांत प्रत्येकी एक असे स्फोट घडविण्यात आले. युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) या अतिरेकी संघटनेने हे स्फोट घडविल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या स्फोटांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली; तरी दहशतवाद्यांनी केवळ त्यांचा प्रभाव जाणवून देण्यासाठी हे स्फोट घडविले असल्याचे मत एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.

मणिपूर राज्यामधील पूर्व इंफाळ जिल्ह्यामध्येही दोन स्फोट घडविण्यात आले आहेत. उल्फाच्या येथील "परेश बरुहा' गटाने आज बंद पुकारुन लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले होते. "भारताचा प्रजासत्ताक दिन हा येथील भागाचे वसाहतीकरण केल्याच्या स्मरणाचा दिवस आहे. तेव्हा आम्ही या दिवसावर सामूहिक बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे,'' असे या संघटनेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

Web Title: Militants set off blasts in Manipur, seven in Assam