राजपथावर लष्करी आणि महिला शक्तीचे दर्शन

राजपथावर लष्करी आणि महिला शक्तीचे दर्शन

नवी दिल्ली : देशाचे शक्तिशाली लष्कर, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा आणि विविधतेत एकता या गौरवशाली परंपरेचे दर्शन शनिवारी राजपथावर 70 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य संचलनात घडले. देशभरातून आलेल्या हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संचलनाचा दिमाखदार सोहळा झाला. या संचलनात प्रथमच आझाद हिंद सेनेच्या माजी सैनिकांनी सहभाग घेतला होता. प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा राजपथावर थाटमाटात आणि भव्यदिव्य स्वरूपात पार पडला. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सीरिल राम्फोसा हे प्रमुख पाहुणे होते. तसेच, अनिवासी भारतीयांनादेखील या वेळी विशेष निमंत्रण देण्यात आले होते. 

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण राजधानीत कडेकोट बंदोबस्त होता. राजपथ परिसराची नाकाबंदी केली होती. राजपथ परिसरातील इमारतींवर शार्प शूटर तसेच त्यालगत असलेल्या भागात सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते. संचलनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि तीन दलांच्या प्रमुखांनी इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती येथे पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर पंतप्रधान यांनी राजपथावर मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रमुख पाहुणे राम्फोसा यांचे स्वागत केले. यानंतर राष्ट्रपती कोविंद यांनी ध्वजवंदन केले. या वेळी 21 तोफांची सलामी देण्यात आली आणि हवाई दलाच्या एम-आय हेलिकॉप्टरनी राजपथावर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर दीड तास राजपथावर चाललेल्या कार्यक्रमात लष्करी शक्ती, महिला शक्ती, राज्यांचे चित्ररथ यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. 

अशोकचक्र प्रदान 

जम्मू-काश्‍मीरमधील दहशतवाद्यांचा सामना करताना हुतात्मा झालेले लान्स नायक नजीर अहमद वणी यांना जाहीर झालेला मरणोत्तर अशोकचक्र हा त्यांच्या पत्नी महजबिन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वीकारला. 

संचलनाची वैशिष्ट्ये 

- आझाद हिंद सेनेचे माजी सैनिक, चंडीगडचे लालतीराम (वय 98), गुरुग्रामचे परमानंद (वय 99), हीरा सिंग (वय 97) आणि भागमल (वय 95) हे संचालनात सहभागी. 
- इन इंडियांतर्गत तयार केलेल्या के-9 वज्र तोफेचे राजपथावर प्रथमच आगमन 
- सशस्त्र दल, निमलष्करी दल, दिल्ली पोलिस, एनसीसी, एनएसएसच्या 16 पथकांचा 16 बॅंडसह सहभाग 
आसाम रायफल्सच्या महिला पथकाचा प्रथमच सहभाग 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com