दिल्ली गारठली; 15 वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 1 January 2021

सफदरजंगमध्ये आज सकाळचे तापमान 1.1 डिग्री सेल्सियस रिकॉर्ड करण्यात आले.

नवी दिल्ली- नव्या वर्षात (New Year 2021) दिल्लीचे तापमान (Delhi Temperature) 1.1 डिग्री सेल्सियसपर्यंत घसरले. सफदरजंगमध्ये आज सकाळचे तापमान 1.1 डिग्री सेल्सियस रिकॉर्ड करण्यात आले. भारतीय हवामान विभागानुसार, गेल्या पंधरा वर्षात नोंदले गेलेले हे सर्वात कमी तापमान आहे. त्यामुळे दिल्लीकरांची नवीन वर्षाची सुरुवात कडाक्याच्या थंडीने झाली. संपूर्ण दिल्लीमध्ये धुके आणि कडाक्याची थंडी पसरली होती. 

याआधी 8 जानेवारी 2006 मध्ये दिल्लीतील किमान तापमान 0.2 डिग्री सेल्सियस रिकॉर्ड करण्यात आले होते. मागील वर्षी जानेवारी महिन्यातही तापमान 2.4 डिग्री सेल्सियस रिकॉर्ड करण्यात आले होते. 

'कर्नल नरेंद्र नसते तर सियाचिनवर पाकचा ताबा असता'; PM मोदींनी वाहिली...

भारतीय हवामान विभागातील अधिकारी कुलदीप श्रीवास्तव यांनी सांगितलं की, सकाळी 6 वाजता सफदरजंग आणि पालममध्ये दाट धुके पडले होते, त्यामुळे दृश्यता शून्य मीटरपर्यंत कमी झाली होती. श्रीवास्तव पुढे म्हणाले की, येत्या काही दिवसात तापमानात वाढ पाहायला मिळेल. 4 ते 5 जानेवारीपर्यंत किमान तापमान 8 डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 

हरियाणा, राजस्थानच्या अनेक भागात तापमान शून्याच्या खाली गेले होते. आयएमडीच्या माहितीनुसार, दृश्यता 0 ते 50 मीटरदरम्यान असल्यास दाट धुके पसरतात. मध्यम धुक्यांमध्ये दृश्यता 51 ते 200 मीटरदरम्यान असते. साधारण धुके 201 ते 500 मीटर दृश्यतेदरम्यान असते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minimum temperature of 1 degrees Celsius was recorded in Delhi today