प्रियांका गांधींपुढे झुकले प्रशासन; अखेर दिली परवानगी

वृत्तसंस्था
शनिवार, 20 जुलै 2019

पीडितांच्या नातेवाइकांना भेटल्याशिवाय जाणार नाही, असा पवित्रा घेत प्रियांका गांधी यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलनास सुरवात केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. अखेर आज सकाळी मिर्झापूर जिल्हा प्रशासनाने त्यांना पीडित कुटुंबीयांच्या भेटीची परवानगी दिली आहे.

लखनौ : उत्तर प्रदेशमधील सोनभद्र येथील हत्याकांडात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भेट देण्यासाठी गेलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष प्रियांका गांधी यांना शुक्रवारी अडविण्यात आल्यानंतर त्यांनी रात्रभर तेथेच ठिय्या मांडला अखेर आज (शनिवार) प्रशासनाने नमती भूमिका घेत त्यांना भेटीची परवानगी दिली आहे. 

पीडितांच्या नातेवाइकांना भेटल्याशिवाय जाणार नाही, असा पवित्रा घेत प्रियांका गांधी यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलनास सुरवात केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. अखेर आज सकाळी मिर्झापूर जिल्हा प्रशासनाने त्यांना पीडित कुटुंबीयांच्या भेटीची परवानगी दिली आहे.
 
सोनभद्र येथील घोरावाल भागातील जमिनीच्या वादातून बुधवारी (ता. 17) सरपंच यज्ञदत्त याच्या समर्थकांनी गोंड जमातीतील व्यक्तींवर गोळीबार केला. यात दहा जण ठार झाले. त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियांका गांधी या सोनभद्र येथे गेल्या होत्या. प्रियांका गांधी यांनी वाराणसी येथे जाऊन रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींची भेट घेतली. यानंतर सोनभद्रला जात असताना वाराणसी- मिर्झापूर सीमेवर त्यांना अडविण्यात आले. भाजपच्या दबावाखाली झुकणार नाही. सोनभद्रमधील घटनेत बळी पडलेल्यांच्या नातेवाइकांना भेटण्यात काय गैर आहे, असा प्रश्‍न करीत प्रियांका गांधी यांनी रस्त्यावर धरणे धरले. त्यांना जवळील चुनार विश्रांतिगृहात नेण्यात आले. तेथे वीज नसल्याने हे प्रकरण आणखी पेटले होते. अखेर प्रशासनाने त्यांना भेटीची परवानगी दिली आहे.  

या घटनेचे राजकीय क्षेत्रात तीव्र प्रतिसाद उमटले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांना बेकायदा अटक केली असून, उत्तर प्रदेश सरकार लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mirzapur Priyanka Gandhi finally meet families of Sonbhadra victims