मुझफ्फरपूरनंतर पाटण्यातही गैरप्रकार 

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

पाटण्यातील एका निवारागृहातील गैरप्रकार सामोरा आला आहे. पाटण्यातील या निवारागृहात दोन महिलांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले असून, या संदर्भात दोघांना अटक करण्यात आली आहे. निवारागृहाचा डॉक्‍टर आणि एका परिचारिकेचाही पोलिस शोध घेत आहेत. मुझफ्फरपूरच्या बालिका निवारागृहातील गैरप्रकारांची धूळ खाली बसत नाही, तोपर्यंत हे प्रकरण सामोरे आले आहे. 

पाटणा - पाटण्यातील एका निवारागृहातील गैरप्रकार सामोरा आला आहे. पाटण्यातील या निवारागृहात दोन महिलांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले असून, या संदर्भात दोघांना अटक करण्यात आली आहे. निवारागृहाचा डॉक्‍टर आणि एका परिचारिकेचाही पोलिस शोध घेत आहेत. मुझफ्फरपूरच्या बालिका निवारागृहातील गैरप्रकारांची धूळ खाली बसत नाही, तोपर्यंत हे प्रकरण सामोरे आले आहे. 

अटक करण्यात आलेल्यांमध्ये निवारागृहाच्या खजिनदार मनीषा वर्मा हिचा समावेश असून, अनेक बड्या राजकीय नेत्यांबरोबरची तिची छायाचित्रे व्हायरल झाल्यामुळे हे प्रकरण संवेदनशील झाले आहे. 

"आसरा' या निवारागृहात 18 वर्षांची पूनम आणि 40 वर्षांच्या बबली यांचा मृत्यू झाला. या दोघींचा मृत्यू आधीच झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षकांनी दिली. या संदर्भात काल रात्री उशिरा राजीवनगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. या निवारागृहाचे सचिव चिरंतन कुमार आणि खजिनदार मनीषा वर्मा यांना अटक करण्यात आली असून, त्यांची चौकशी केली जात असल्याचे पाटण्याचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मनू महराज यांनी सांगितले. एफआयआरमध्ये आणखी दोघांची नावेही आहेत. मात्र, अटक दोघांना झाली आहे. 

या दोघींच्या मृत्यूनंतर पोलिसांनी या निवारागृहावर छापा घातला तेव्हा तेथे 50 ऐवजी 72 मुली आणि महिला आढळल्या. त्यातील बारा जणी सोडून बाकीच्यांची मानसिक अवस्था चांगली नसल्याचे ते म्हणाले. 

या निवारागृहाची स्थिती चांगली नव्हती. तेथे भोजन तसेच वैद्यकीय उपचारांबाबत दुर्लक्ष झाल्याचे चित्र होते. या संदर्भात तपासासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून, ती सर्व पैलूंची पाहणी करेल, असे पाटण्याचे जिल्हा दंडाधिकारी कुमार रवी यांनी सांगितले. शवविच्छेदनात बाह्य जखमा आढळल्या नाहीत, मात्र पुढील तपासणीसाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. 

राजकीय लागेबांधे 
निवारागृहाची खजिनदार मनीषा दयान ऊर्फ मनीषा वर्माचे राजकीय लागेबांधे पाहून अधिकारी चक्रावले आहेत. बड्या नेत्यांबरोबरची तिची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) आमदार आणि माजी मंत्री श्‍याम रजक, शिक्षणमंत्री कृष्णनंदन प्रसाद वर्मा, भाजपचे मंत्री विनोद नारायण झा, भाजपचे आमदार नितीन नवीन, राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) माजी मंत्री रामदेव ऋषिदेव आणि आरजेडीचे माजी प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांच्याबरोबर मनीषाची छायाचित्रे आढळली आहेत. गेल्या काही वर्षांत तिच्याकडे अचानक भरपूर पैसा आल्याची माहितीही मिळाली.

Web Title: Miscarriage in Patana after Muzaffarpur