अंत्यसंस्कार केल्यानंतर घरी अवतरली बेपत्ता नीतू 

पीटीआय
शनिवार, 5 मे 2018

नोएडातील राज सक्‍सेना यांची 25 वर्षांची मुलगी नीतू अठरा दिवसांपासून बेपत्ता होती. नीतूपासून वेगळा राहात असलेल्या पतीनेच नीतूचा खून केला असावा, असा आरोप पालकांनी केला

नोएडा : बेपत्ता झालेली मुलगी समजून पालकांनी दुसऱ्याच एका मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मात्र, त्यानंतर बेपत्ता झालेली मुलगी स्वतःच घरी आल्यामुळे पालकांसह सर्वांनाच धक्का बसला. पोलिसही या प्रकारामुळे चक्रावून गेले. 
नोएडातील राज सक्‍सेना यांची 25 वर्षांची मुलगी नीतू अठरा दिवसांपासून बेपत्ता होती. नीतूपासून वेगळा राहात असलेल्या पतीनेच नीतूचा खून केला असावा, असा आरोप पालकांनी केला. 

त्यानुसार, पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान, नोयडात महामार्गाजवळ एका मुलीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह एका व्यक्तीला आढळून आला. त्याच्या दुसऱ्या दिवशी हा मृतदेह नीतूचाच असल्याचे सांगत तिच्या पालकांनी संबंधित मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले. मात्र, त्यानंतर स्वतः नीतू घरी परतल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. 

या संदर्भात बोलताना राज म्हणाले की, मृतदेहाचे हात, पाय आणि केस नीतूप्रमाणेच होते. चेहरा जळालेला होता. हा नीतूचाच मृतदेह असावा असे आम्हाला वाटले. आम्ही विनंती करूनही पोलिसांनी "डीएनए' चाचणी केली नाही. 

पती, सासऱ्यांना नाहक त्रास 

या प्रकरणी पोलिसांनी नीतूचा पती आणि सासऱ्यांना अटक केली होती. मात्र, त्यांचा या प्रकरणाशी संबंध नाही अशी माहिती समोर आली. दरम्यान, पूरन नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याबरोबर नीतू इटावा येथे राहात होती, अशी माहिती समोर आली आहे.

या सर्व प्रकारानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले तो मृतदेह कोणाचा होता, हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नीतू आणि तिचा पती हे तीन वर्षांपासून वेगळे राहात होते. 

 

Web Title: Missing neetu back home after crematorium