काश्‍मीरचा बेपत्ता युवक दहशतवादी संघटनेत सामील 

काश्‍मीरचा बेपत्ता युवक दहशतवादी संघटनेत सामील 

नोईडा : उत्तर प्रदेशातील नोईडा येथील एका खासगी विद्यापीठात शिकणारा बेपत्ता विद्यार्थी हा काही दिवसांपूर्वीच दहशतवादी संघटनेत सामील झाला असल्याचा दावा सोशल मीडियावर शुक्रवारी करण्यात आला आहे. श्रीनगरचा रहिवासी एहतेशाम बिलाल सोफी (वय 17) हा ग्रेटर नोईडाच्या शारदा विद्यापीठात पहिल्या वर्षाला शिकत होता. 

बिलाल 28 ऑक्‍टोबरपासून गायब होता. त्याने विद्यापीठातून दिल्लीला जाण्याची परवानगी घेतली होती. तो गेल्यानंतर परतलाच नाही, असे सूत्राने सांगितले. या प्रकरणी ग्रेटर नोईडाच्या नॉलेज पार्क पोलिस ठाण्याबरोबरच श्रीनगरच्या खानयार पोलिस ठाण्यातही तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदली गेली आहे. अखेर तो दहशतवादी संघटनेत दाखल झाल्याचा उलगडा सोशल मीडियामुळे झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रात सोफी हा काळ्या कपड्यात दिसतो. तो इसिसच्या विचाराचा प्रभाव असलेली दहशतवादी संघटना आयएसजेकेमध्ये सामील झाल्याचा दावा करण्यात आला आहे. दहशतवादविरोधी पथकाचे महासंचालक असीम अरुण यांनी बिलालचे फोटो शुक्रवारी सायंकाळी सोशल मीडियावर प्रसारित झाल्याचे म्हटले आहे.

फोटोबरोबरच बिलालने आयएसजेकेमध्ये सामील झाल्याची घोषणा केली आहे. फोटोत बिलालच्या मागे इसिसचा झेंडा आहे. त्याने विमान तिकीट काढले, मात्र त्याने प्रवास केला नाही, असे तपासात आढळून आले आहे. बेपत्ता झाल्यानंतर त्याचे लोकेशन जम्मू-काश्‍मीरमध्ये आढळले. मात्र तो घरी गेला नाही. विद्यापीठात त्याच्या समवेत शिकणाऱ्या चार अन्य काश्‍मिरी विद्यार्थ्यांची चौकशी केली असता तो दहशतवादी संघटनेत गेल्याचे पुरावे हाती लागले.

तत्पूर्वी मंगळवारी जम्मू-काश्‍मिरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी गृहमंत्री राजनाथसिंह यांना बेपत्ता विद्यार्थ्याचा शोध घेण्याची मागणी केली होती. यासंदर्भात त्यांनी ट्‌विट केले होते. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता विद्यार्थ्याच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स गोळा केले असून श्रीनगरला ज्या क्रमांकाशी सर्वाधिक संपर्क करण्यात आला आहे, त्याचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com