
केंद्राकडून तपास यंत्रणांचा गैरवापर
द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मोदी सरकारविरोधात तक्रार केली आहे. मोदी सरकार त्यांच्या राजकीय विरोधकांविरोधात तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत यामध्ये तातडीने लक्ष घालण्याची मागणी राष्ट्रपतींना मंगळवारी पत्राद्वारे केली आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज दुसऱ्यांदा ‘ईडी’ चौकशी झाली. त्या पार्श्वभूमीवर मुर्मू यांना लिहिलेले पत्र महत्त्वाचे मानले जात आहे. दरवाढ आणि जीएसटी मधील वाढीच्या मुद्द्यावर तातडीने चर्चा करण्यास सरकार तयार नसल्याने, पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजावर त्याचा परिणाम होत असल्याची खंत पत्रात व्यक्त केली आहे. या पत्रावर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, आम आदमी पक्षाचे संजयसिंह, आरजेडीचे मनोज झा, यांच्यासह इतर विरोधी नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जनतेचे लक्ष भरकटविण्यासाठी
कायद्याची अंमलबजावणी न घाबरता किंवा पक्षपात न करता केली पाहिजे. सध्या विविध विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांविरोधात बेलगाम आणि कोणत्याही समर्थनाशिवाय ज्या प्रकारे कायद्यांचा वापर होत आहे, तसा तो होऊ नये, अशी अपेक्षाही नेत्यांनी व्यक्त केली आहे. वाढती बेरोजगारी, उपजीविकेच्या साधनांचा अभाव, स्वातंत्र्याची आणि मालमत्तेची वाढती असुरक्षितता अशा समस्यांपासून नागरिकांचे लक्ष हटविण्यासाठी यंत्रणांचा वापर होत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. सरकार संसदेत दरवाढीवर चर्चा होऊ देत नाही, अशी तक्रार करत, पूर्वीच्या सरकारच्या काळात यांवर चर्चा होत असे, याकडे लक्ष वेधले.
Web Title: Misuse Of Investigative Agencies By The Centre Complaints Of Opposition Leaders
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..