#MeToo: एम. जे. अकबर भारतात; देणार सर्व आरोपांना उत्तर

वृत्तसंस्था
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री आणि माजी पत्रकार एम. जे. अकबर परदेशातून भारतात परतले आहेत. देशभरात व्यापक स्तरावर सुरु असलेल्या #MeToo अभियानात अनेक महिलांनी एम जे अकबर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या सर्व आरोपांना लवकरच उत्तर देणार असल्याचे भारतात परतल्यावर त्यांनी स्पष्ट केले आहे. 
 

नवी दिल्ली- केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री आणि माजी पत्रकार एम. जे. अकबर परदेशातून भारतात परतले आहेत. देशभरात व्यापक स्तरावर सुरु असलेल्या #MeToo अभियानात अनेक महिलांनी एम जे अकबर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या सर्व आरोपांना लवकरच उत्तर देणार असल्याचे भारतात परतल्यावर त्यांनी स्पष्ट केले आहे. 

विमानतळावरुन बाहेर जाताना पत्रकारांच्या प्रश्नांवर त्यांनी याप्रकरणी लवकरच उत्तर देणार असल्याचे सांगितले. बाकी प्रश्नांवर उत्तर देणे त्यांनी तूर्तास टाळले. अकबर यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. या आरोपांवर अकबर यांच्या स्पष्टीकरणानंतर भाजपा आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. भाजपातील सूत्रांच्या मते, अकबर यांच्यावरील या गंभीर आरोपांमुळे ते मंत्रिपदावर जास्त काळ राहण्याची शक्यता नाही.

दरम्यान, भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. हे आरोप सत्य आहेत की चुकीचे हे पाहावे लागेल, असे अमित शाह यांनी म्हटले होते. ज्यांनी आरोप केले आहेत, त्यांच्या पोस्टची सत्यता पडताळून पाहावी लागेल. तुम्ही माझ्या नावाचा उपयोग करुन काहीही लिहू शकता, असे शाह यांनी म्हटले होते.

Web Title: Mj Akbar Returns To India Amid Accusations Of Sexual Harassment Against Him Says There Will Be A Statement Later On