
Bengalur News : विद्यमान आमदार, खासदारांना निवडणुकीसाठी उमेदवारी नाही
बंगळूर : आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे डझनहून अधिक खासदार आणि विधान परिषदेचे सदस्य विधानसभा निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त केली असली तरी भाजप हायकमांडने मात्र त्याला होकार दर्शवलेला नाही. लोकसभा, राज्यसभा आणि विधान परिषदेचे सदस्य राजीनामा देऊन किंवा त्याशिवाय विधानसभा निवडणूक लढले आणि ते जिंकले तर ते आपल्या पदाचा राजीनामा देतील.
मात्र यावेळी काही जणांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे निवडणुकीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी भाजप हायकमांडने कोणालाही परवानगी दिलेली नाही. लोकसभा आणि विधान परिषदेत काही विधेयके मंजूर होत नाहीत. त्यामुळे एक एक जागा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे हायकमांडचे मत आहे.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सहभागी होण्यासाठी वर्षभरापासून पडद्याआडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कसरत करणाऱ्या इच्छुकांची निराशा होण्याची शक्यता आहे. कारण २२४ विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांची यादी दिवसेंदिवस वाढत आहे. तरीही लोकसभा, राज्यसभा व परिषदेच्या सदस्यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.
खासदार शिवकुमार उदासी, जी. एम. सिद्धेश्वर, पी. सी. मोहन, प्रताप सिंग, करडी संगण्णा, पी. सी. गद्दीगौडर, रमेश जिगजिनगी, डी. व्ही. सदानंद गौडा, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, शोभा करंदलाजे, ए. नारायणस्वामी, प्रदेश भाजप अध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी राष्ट्रीय राजकारणातून राज्याच्या राजकारणात येण्याचा मानस पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केला आहे.
भाजपमधील मोठ्या संख्येने खासदार विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असले तरी पक्ष हायकमांड त्याला परवानगी देण्यास तयार नाही. हायकमांडने सहमती दर्शवल्यास भाजपचे दहाहून अधिक खासदार विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. या खासदारांनी मागील विधानसभा निवडणूकही लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.