स्मशानभूमीत आमदाराने ठोकला मुक्काम

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 जून 2018

नवी दिल्ली - आंध्र प्रदेशमधील तेलुगू देसम पक्षाचे आमदार निम्माला रामा नायडू यांनी पूर्ण रात्र स्मशानभूमीत वास्तव्य केले. ही विचित्र गोष्ट करण्यामागे कोणताही राजकीय स्टंट नाही, तर स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम करणाऱ्या कामगारांच्या मनातील भीती घालविण्याच्या उद्देशाने त्यांनी हे कृत्य केले. त्यांची ही युक्ती कामी आली असून स्मशानातील काम वेगाने सुरू झाले आहे. 

नायडू हे आंध्रतील पश्‍चिम गोदावरी जिल्ह्यातील आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातील स्मशानभूमीत काम करण्यास मजूर घाबरत होते. नायडू यांना त्यांच्यातील भीती दूर करायची होती. दुष्टात्मा अशी कोणतीही गोष्ट नाही, हे मजुरांना पटवून देण्यासाठी नायडू शुक्रवारी (ता. २२) पूर्ण रात्र स्मशान घाटावर झोपले व सकाळी घरी गेले. स्मशानात झोपण्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी आपण दोन-तीन रात्र स्मशानात झोपणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्मशानात काम करण्यास मजूर घाबरत असल्याने आपण हे करीत आहोत. असे केल्याने मजुरांना हिंमत मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

स्मशानात फारशा सोई नसल्याने नूतनीकरणाचे काम सुरू केले होते. त्यासाठी तीन कोटींची तरतूदही मंजूर झालेली आहे. मात्र, एक वर्ष झाले तरी काम पूर्ण झाले नव्हते. परंतु, नायडूंच्या युक्तीने काम पुढे सरकले आहे. नायडू म्हणाले, की स्मशानात आत्मे असल्याची मजुरांचा समज आहे. जर तेथे काम केले तर त्यांचे मोठे नुकसान होईल, अशी भीती त्यांना वाटत होती.

स्मशानभूमीत झोपताना मला कोणत्याही आत्म्याने नाही पण डासांनी खूप त्रास दिला.  
- निम्माला नायडू, आमदार, तेलुगू देसम

आत्म्यासंबंधीची भीती घालविण्यासाठी निम्माला रामा नायडू यांनी केलेल्या कृतीमुळे ते कौतुकास पात्र ठरतात. 
- पिनराई विजयन, मुख्यमंत्री, केरळ 

Web Title: mla nimmala naidu sleeping in crematorium