काश्‍मिरात मोबाईल एसएमएस सेवा बंद

पीटीआय
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

राजस्थानच्या ट्रकचालकाची हत्या
काश्‍मीरमध्ये सोमवारी रात्री शोपियाँ जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांनी राजस्थानच्या एका ट्रकचालकाची गोळी झाडून हत्या केली, तर एका बागमालकावर हल्ला करण्यात आला. मृताचे नाव शरीफ खान असे आहे. दहशतवाद्यात पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे. काश्‍मीर खोऱ्यात फळांची वाहतूक वाढल्याने दहशतवाद्यांनी भीती निर्माण करण्यासाठी हल्ला केल्याचे सुरक्षा दलाचा संशय आहे.

श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यात पोस्टपेड सेवा सुरू होऊन चोवीस तास उलटत नाही तोच खबरदारीचे उपाय म्हणून एसएमएस सेवा बंद करण्यात आली. काश्‍मीरमध्ये सोमवारी ७२ दिवसांच्या खंडानंतर पोस्टपेड मोबाईल सेवा बहाल करण्यात आली होती. मात्र इंटरनेट सेवा अद्याप स्थगितच आहे.

मोबाईलची एसएमएस सेवा काल सायंकाळी पाच वाजताच बंद करण्यात आली. राज्यातील २५ लाखांहून अधिक प्रीपेड मोबाईल सेवा आणि सोशल मीडियासह अन्य इंटरनेट सेवाही सध्या बंद राहणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काल इंटरनेट सेवा लवकरच सुरू करण्याचे सूतोवाच केले होते. मात्र सुरक्षा दलाच्या मते ही सेवा सुरू होण्यास अद्याप दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. प्रीपेड सेवेबाबत पुढील महिन्यात निर्णय घेता येईल. मात्र पोस्टपेड सेवा सुरू झाल्याने बाह्यजगाशी संपर्क पुन्हा साधला जाईल, अशी आशा काश्‍मिरी नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, आजही काश्‍मीर खोऱ्यात दुकाने, बाजारपेठ, सार्वजनिक वाहतूक बंद होती. परंतु खासगी वाहने, ऑटोरिक्षा, टॅक्‍सीची वर्दळ अनेक भागात दिसली. श्रीनगरच्या रस्त्यावर फेरीवाले देखील होते. काश्‍मीरच्या पालकांनी आपल्या पाल्यांना अजूनही शाळेत न पाठविल्याने आजही शैक्षणिक संस्थांत शुकशुकाट जाणवत होता. सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती साधारण नोंदली गेली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mobile SMS Service Close in Kashmir