नोटाबंदीला विरोध करणारे काळ्या पैशाचे "राजकीय पुजारी'

पीटीआय
सोमवार, 9 जानेवारी 2017

भ्रष्टाचार, काळा पैसा आपल्या समाजाला आणि राजकीय व्यवस्थेला पंगू करत आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे राजकीय व्यवस्थेतच काळ्या पैशाच्या काही उपासकांचा समावेश आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत त्या राजकीय पुजाऱ्यांकडून हा निर्णय समाजहितविरोधात असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे.

बंगळूर - सरकारचे निर्णय जनतेच्या विरोधात असल्याची ओरड ठोकणारे लोक भ्रष्टाचारी आणि काळ्या पैशाचे "राजकीय पुजारी' असून, ते अर्थव्यवस्था, राजकीय व्यवस्था आणि समाज व्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न करत असल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांचा पंतप्रधानांनी खरपूस समाचार घेतला.

येथे आयोजित चौदाव्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या निमित्ताने मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयाचा थेट उल्लेख फारसा केला नाही; मात्र अनिवासी भारतीय आणि भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी अनेक योजना जाहीर केल्या. संमेलनात भारतीय वंशाचे पोर्तुगालचे पंतप्रधान ऍन्टोनिओ कोस्टा या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

त्याचबरोबर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याबरोबरच अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, कार्यक्रमाचे भागीदार, केंद्रीय मंत्र्यांची विशेष उपस्थिती होती. प्रवासी भारतीय संमेलनाचा आज दुसरा दिवस होता. बंगळूरच्या इंटरनॅशनल एक्‍झिबिशन सेंटरमध्ये होत असलेल्या सोहळ्यात जगभरातील सहा हजारांहून अधिक प्रवासी भारतीय सहभागी झाले आहेत. प्रवासी भारतीय दिवसाची सुरवात 2003 मध्ये वाजपेयी सरकारने केली होती.

मोदी म्हणाले की, काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात लढण्याची मोठी जबाबदारी उचलली आहे. काळा पैसा आणि गैरव्यवहाराने आपली राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था आणि समाज, देशाला खिळखिळे केले आहे. दुर्दैवाने काही लोक काळ्या पैशाचे राजकीय पुजारी बनले आहेत, जे की या सरकारच्या निर्णयाला जनतेच्या विरोधी असल्याचा डंका पिटत आहेत. दुसरीकडे सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिल्याबद्दल भारतीय वंशाच्या नागरिकांचे मोदी यांनी आभार मानत म्हटले की, काही लोक मात्र भ्रष्टाचारविरोधी अभियानात अडथळे आणत आहेत. देशाच्या विकासात भारतीय वंशाच्या समुदायाच्या भूमिकेबाबत बोलताना मोदी म्हणाले की, 69 अब्ज डॉलरची गुंतवणूक करून भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसाठी मोठे योगदान दिले आहे. माझ्यादृष्टीने एफडीआयचे दोन अर्थ निघतात, एक म्हणजे "फॉरेन डायरेक्‍ट इन्व्हेस्टमेंट' म्हणजेच प्रत्यक्ष परकी गुंतवणूक आणि दुसरे "फर्स्ट डेव्हलप इंडिया' म्हणजेच अगोदर भारताचा विकास होय. एकविसावे शतक हे नक्कीच भारतीयांचे असेल, याचा मला ठाम विश्‍वास असल्याचे मोदी म्हणाले.

संमेलनाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी परदेशात जाणाऱ्या भारतीय कामगारांसाठी प्रवासी कौशल्य विकास योजना सुरू केल्याचे जाहीर केले. परदेशात काम करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी ही योजना असेल असे स्पष्ट करत, या योजनेत अकुशल कामगारांचा कौशल्यविकास व्हावा आणि ते जगाशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज व्हावेत यावर भर देणार असल्याचे ते म्हणाले. नोकरीचे आमिष दाखवून परदेशात जाणाऱ्या भारतीयांना फसवणाऱ्या एजंटांवर कठोर कारवाई केली जात असल्याचे सांगून, भारतीय वंशाच्या पीआयओ (पर्सन ऑफ इंडियन ओरिजीन) कार्डधारकांना ओसीआय (ओव्हरसिज सिटिझन ऑफ इंडिया) कार्ड घेण्याचे आवाहन केले.

Web Title: Modi again defends Demonetization