कुपोषणासारख्या समस्यांवर काम करा; महिला खासदारांना मोदींचा मंत्र

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 12 जुलै 2019

खासदार म्हणून तुमच्या मतदारसंघातील नवनव्या जबाबदाऱ्या सांभाळतानाच कुपोषण मुक्तीसारख्या नवीन क्षेत्रांमध्ये कार्यरत रहा, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपच्या महिला खासदारांना दिला. 

नवी दिल्ली : खासदार म्हणून तुमच्या मतदारसंघातील नवनव्या जबाबदाऱ्या सांभाळतानाच कुपोषण मुक्तीसारख्या नवीन क्षेत्रांमध्ये कार्यरत रहा, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपच्या महिला खासदारांना दिला. 

सतराव्या लोकसभेतील महिला, युवा, मागासवर्गीय अशा सात गटांतील खासदारांना पंतप्रधान सध्या भेटत आहेत. संसद अधिवेशनाच्या काळात पंतप्रधान निवासस्थानी होणाऱ्या या बैठकांमध्ये मोदी जास्तीत जास्त खासदारांना बोलते करण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजते. यंदा लोकसभेत सर्वाधिक म्हणजे 78 महिला खासदार निवडून आल्या असून त्यात अमेठीच्या स्मृती इराणी यांच्यासह सत्तारूढ भाजपच्या सर्वाधिक 41 महिला खासदार आहेत.

संसदेच्या कामकाजात महिलांचा सहभाग अधिकाधिक वाढवावा यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. यंदाच्या लोकसभेत सुषमा स्वराज, सुमित्रा महाजन, विजया चक्रवर्ती यासारख्या दिग्गज लोकप्रतीनिधी संसदेत नाहीत. मात्र इराणी, निर्मला सीतारामन, अनुसूया उईके, मीनाक्षी लेखी, पूनम महाजन या नव्या फळीतील महिला नेत्या सरकारचा गड यशस्वीपणे लढविण्याची कामगिरी पार पाडताना दिसतात. मोदींनी महिला खासदारांशी आज सकाळी स्वतंत्रपणे संवाद साधला. भाजपा अध्यक्ष अमित शहा  व संसदीय कार्य मंत्री प्रह्लाद जोशी हजर होते. 

सुरवातीला मोदींनी सर्व खासदारांना स्वतःचा परिचय करून देण्यास सांगितले. "तुम्हा सर्वांना परस्परांचा परिचय-ओळख झाली पाहिजे,' असे सांगून ते म्हणाले की खासदार म्हणून आपल्या मागे कामे असतातच. पण मतदारसंघांतील कामांतून वेळ काढून नव्या क्षेत्रात तुम्ही काम करावे. राजकारण फक्त स्वतःसाठी नसते तर दुसऱ्यासाठी काही तरी भरीव करणे हेच खरे राजकारण अशी जनसंघ व भाजपच्या दिग्गजांची शिकवण असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

गुजरातमधील एका प्रयोगाचे उदाहरण दिले. ते म्हणाले की मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना आपल्या सुदृढ बालकांची छायाचित्रे राज्य सरकारच्या मोबाईल ऍपवर टाकण्याचे आवाहन केले होते. ती छायाचित्रे पाहून इतर महिलांनाही आपापल्या मुलांना सुदृढ ठेवण्याची प्रेरणा मिळत असे. हाच प्रयोग तुम्ही तुमच्या मतदारसंघांतही राबवू शकता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi asks BJPs women MPs to focus on health sanitation eradicating malnutrition