आर्थिक नाकेबंदी संपुष्टात आणू

वृत्तसंस्था
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

मुख्यमंत्री इबोबी सिंह यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राज्य सरकार अत्यंत भ्रष्ट असून, कमिशन घेऊन कामे करते. कॉंग्रेस सरकारच्या काळात मणिपूरचा विकास खुंटला असून, ते पिछाडीवर पडले आहे. राज्यात रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा, पिण्याचे मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यातही या सरकारला साफ अपयश आल्याचे दिसते

इंफाळ - कॉंग्रेसने आपल्या 15 वर्षांच्या सत्ताकाळात मणिपूरसाठी जे केले नाही, ते काम भाजप अवघ्या 15 महिन्यांत करून दाखवेल. विधानसभा निवडणुकीनंतर भाजप सत्तेत आल्यास राज्यात सुरू असलेली नाकेबंदी संपुष्टात आणली जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरवासीयांना दिले आहे.

निवडणूक प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मोदी म्हणाले, ""मुख्यमंत्री इबोबी सिंह यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राज्य सरकार अत्यंत भ्रष्ट असून, कमिशन घेऊन कामे करते. कॉंग्रेस सरकारच्या काळात मणिपूरचा विकास खुंटला असून, ते पिछाडीवर पडले आहे. राज्यात रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा, पिण्याचे मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यातही या सरकारला साफ अपयश आल्याचे दिसते.''

नागा करारात राज्यातील नागरिकांविरोधात एकही गोष्ट नाही; मात्र त्यावरून इबोबी सिंह व त्यांचे सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे, असे स्पष्ट करत दीड वर्षापूर्वी हा करार झाला होता, तेव्हा तुम्ही झोपला होता का, असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला. नागरिकांना आवश्‍यक वस्तू उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी असते. मात्र, येथील नागरिकांना या वस्तू सोडा, तर औषधेही उपलब्ध होत नाहीत, असेही मोदी या वेळी म्हणाले.

10 टक्‍क्‍यांचा मुख्यमंत्री
देशात कोणत्याही राज्यात मुख्यमंत्री कमिशन घेत असल्याचे ऐकिवात नाही. मात्र, इबोबी सिंह मात्र याला अपवाद आहेत. कामे करण्यासाठी ते 10 टक्के कमिशन घेतात, ही बाब राज्यातील लहान- सहान पोरांनाही माहिती असल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले. खालच्या थराचे राजकारण करीत ज्यांनी खुर्चीसाठी दोन जमातींमध्ये भांडणे लावली, अशांना पुन्हा संधी देणार का, असा सवालही मोदींनी जनतेला केला.

Web Title: Modi assures Manipur