मोदीबाबूंना भाषणाशिवाय पर्यायच नाही- ममता

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

कोलकाता : नोटाबंदीची योजना रुळावरून घसरली आहे हे मोदीबाबूंना माहीत आहे. त्यामुळे भाषणं देण्याशिवाय त्यांना पर्यायच उरलेला नाही, अशा शब्दांत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
पत्रकारांची बॅंक खाती, इतर तपशील यांचे हॅकिंग केल्याने 'डिजिटल इंडिया'चे पितळ उघड पडल्याची टीका त्यांनी केली. 

ममता बॅनर्जी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, ''सरकार म्हणते डिजिटल व्हा आणि ते सुरक्षित असल्याही ग्वाही देते. तसे ते सुरक्षित असेल तर पत्रकारांच्या बॅंक खात्यांचे तपशील 'हॅकर्स'कडून उघड कसे केले जातात?,'' असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. 

"पत्रकारांची बॅंक खाती 'हॅक' करण्यामागे जनहिताचा उद्देश नसून गोपनीयतेचे उल्लंघन करणे आहे." 
हे कृत्य म्हणजे दहशत पसरविण्याचा आणि आवाज गप्प करण्याचा प्रयत्न आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

''सर्वाधिक भ्रष्टाचारी लोक भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्याच्या गोष्टी करीत आहेत. नोटाबंदी केवळ मोदी व त्यांच्या निकटच्या सहकाऱ्यांच्या मदतीसाठी केली आहे. नोटाबंदीचा अर्थ म्हणजे देशाची अर्थव्यवस्था निकामी करणे. या सरकारची विध्वंसक व अरेरावीची वृत्ती जगात सर्वांत मोठ्या असलेल्या लोकशाहीचा नाश करणारी आहे,'' असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. 

यापूर्वी तृणमूल कॉंग्रेसचे राज्यसभेतील पक्षनेते डेरेक ओब्रायन यांनी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, भाजपकडून ममता बॅनर्जी यांना धोका आहे. त्यांची धोरणे, सुशासन व नोटाबंदीवर कोट्यवधी जनतेच्या वतीने त्यांनी मांडलेली भूमिका याला भाजप तोंड देऊ शकत नाही. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi babu has no option except giving bhashan