PM Narendra Modi : काहीजणांना चांगले पाहवत नाही; मोदींची राजस्थानात विरोधकांवर टीका

पंतप्रधान मोदी कोणाचेही नाव न घेता पुढे म्हणाले, की प्रत्येक गोष्ट मतांमध्ये मोजणाऱ्या व्यक्ती देशाला डोळ्यासमोर ठेवून योजना आखू शकत नाहीत.
Modi criticizes opposition in Rajasthan development politics
Modi criticizes opposition in Rajasthan development politicssakal

जयपूर : ‘‘काहीजणांमध्ये नकारात्मकता ठासून भरली असून त्यांना देशात काहीही चांगले झालेले पाहण्याची इच्छा नाही, त्यांना फक्त वाद निर्माण करायला आवडते,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमध्ये विरोधकांवर हल्ला चढविला.

ते राज्यातील नाथद्वारा शहरात विविध विकासकामांच्या उद्‌घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा, मुख्यमंत्री अशोक गेहलोत व राज्यातील इतर नेते उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी कोणाचेही नाव न घेता पुढे म्हणाले, की प्रत्येक गोष्ट मतांमध्ये मोजणाऱ्या व्यक्ती देशाला डोळ्यासमोर ठेवून योजना आखू शकत नाहीत. केवळ याच विचारसरणीमुळे देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले नाही. देशातील काही लोक या विकृत विचारधारेला बळी पडले आहेत.

त्यांच्यामध्ये नकारात्मकता एवढी ठासून भरली आहे, की देशात काहीही चांगले पाहण्याची त्यांची इच्छा नाही. आपले सरकार आधुनिक पायाभूत सुविधांवर भर देत आहे. सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधांत अभूतपूर्व गुंतवणूक होत असल्याचा दावाही मोदींनी केला. राजस्थानमध्ये दूरदृष्टी ठेवून पायाभूत सुविधांचा विकास करण्यात आला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्यातील मतभेद अधोरेखित करत मोदी म्हणाले, की हे कसल्या प्रकारचे सरकार आहे, जे स्वत:च्याच आमदारांवर विश्वास ठेवत नाही आणि हे आमदारही आपल्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवत नाही.

सरकारमधील प्रत्येक घटक एकमेकांचा अपमान करण्याची स्पर्धा करत आहे. जर पाच वर्षे राजस्थानचे मुख्यमंत्रिपदच धोक्यात असेल तर राजस्थानच्या विकासाची काळजी कोण करेल, असा सवालही मोदींनी केला. सचिन पायलट यांनी मंगळवारी सोनिया गांधी नव्हे तर भाजप नेत्या वसुंधराराजे या मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेत्या वाटतात, अशी टीका केली होती.

विरोधकांचा आदर करावा : गेहलोत

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणापूर्वी मुख्यमंत्री गेहलोत यांनी राजस्थानमधील प्रलंबित प्रकल्पांकडेही पंतप्रधानांचे लक्ष वेधले. लोकशाहीत विरोधकांचा आदर करायला हवा आणि पंतप्रधान मोदीही या दिशेने वाटचाल करतील. असे झाल्यास सत्ताधारी आणि विरोधी पक्ष देशाची अधिक जोमाने सेवा करू शकतील, असा विश्वासही गेहलोत यांनी व्यक्त केला.

मोदींनी घेतले श्रीनाथजी मंदिरात दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी राजस्थानातील राजसमंद जिल्ह्यातील श्रीनाथजी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी १८ ब्राह्मण विद्यार्थी तसेच काही पुजाऱ्यांनी वैदिक मंत्राचा जयघोष केला. त्यानंतर मोदींनी या ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून प्रसाद दिला. त्यापूर्वी मोदींच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लोकांनी गर्दी केली होती. लोकांनी पुष्पवृष्टी करत मोदींच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com