मोदींचा लष्करी दलांच्या शौर्याला सलाम

पीटीआय
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

भारत तिबेट पोलिस दलातील विकास ठाकूर या जवानाचे मोदींनी भरभरून कौतुक केले. हिमाचल प्रदेशमध्ये राहणाऱ्या विकास ठाकूर या जवानाने गावातील घराघरात शौचालय बांधण्यासाठी तब्बल 57 हजार रुपये दिले होते. या सामाजिक बांधिलकीसाठी मोदींनी ठाकूर यांचे कौतुक केले.

नवी दिल्ली -  सीमेवरील पाकिस्तानबरोबरच्या तणावादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लष्करी दलांच्या शौर्याला सलाम करताना त्यांच्या त्यागाचे कौतुक केले. त्याचप्रमाणे यंदाचा दिवाळीचा उत्सव शूर जवानांना समर्पित करत असल्याचे मोदींनी सांगितले.

"संदेश टू सोल्जर्स' या अभियानामध्ये सहभागी होत संदेश पाठवून दिवाळीचा उत्सव साजरा करणाऱ्या जनतेचीही मोदी यांनी स्तुती केली. दर महिन्याला होणाऱ्या "मन की बात' या रेडिओवरील कार्यक्रमात मोदींनी देशाची एकता मजबूत करण्याचे मार्ग शोधण्याचे आणि फुटीरवादी प्रवृत्ती व मानसिकतेच्या पराभवाचे काम करण्याचे आवाहन सर्व जनतेला तसेच राज्य सरकारांना केले.

काश्‍मीर खोऱ्यातील सध्याच्या संघर्षपूर्ण परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर ते म्हणाले की, विविधतेत एकता ही आपली ताकद आहे. ही एकता कायम ठेवण्याची आणि फुटीरवादी प्रवृत्तींपासून देशाला वाचविण्याची जबाबदारी सर्व नागरिक आणि सर्व सरकारांची आहे.

देशातील विविध सुरक्षा दलांमध्ये कार्यरत असलेल्या जवानांमुळेच आपण उत्साहात दिवाळी साजरी करू शकतो, असे सांगत मोदी यांनी जवानांप्रती आदर व्यक्त केला.

दिवाळीनिमित्त जवानांना संदेश देण्याच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देणाऱ्या क्रीडापटू, अभिनेते आणि सर्व सामान्यांचे त्यांनी कौतुक केले. सैन्य, सीमा सुरक्षा दल, सीआरपीएफ असे कोणतेही सुरक्ष दल असो, या जवानांमुळेच आपण दिवाळी साजरी करू शकतो. आयुष्यातील प्रत्येक वळणावर हे जवान राष्ट्रहिताला प्राधान्य देतात. आपले जवान देशाच्या सुरक्षेसाठी अनेक कष्ट झेलत आहेत. आम्ही दिवाळी साजरी करत असताना देशाच्या संरक्षणासाठी कुणी हिमालयाच्या शिखरावर, तर कुणी वाळवंटात उभा राहून पहारा देत आहे. देशवासीयांच्या शुभेच्छांमुळे सैनिकांचे सामर्थ्य वाढते. त्यामुळे यंदाची दिवाळी आपण जवानांना समर्पित करूया, असे मोदी म्हणाले.

दिवाळीचे महत्त्व अधोरेखित करत ते म्हणाले, आपल्या उत्सवामध्ये परंपरेला विज्ञानाची जोड आहे. अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या दिवाळीच्या उत्सवातून प्रेरणा मिळते. म्हणूनच आता जगभरात हा उत्सव साजरा केला जात आहे. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, सिंगापूरमध्ये दिवाळी साजरी केली जात असल्याचे दाखलेही त्यांनी दिले आहेत. दिवाळीसाठी आपण घरात स्वच्छता करतो; पण आता केवळ घरापुरतेच मर्यादित न राहता या स्वच्छतेची व्यापकता वाढवण्याची आवश्‍यकता आहे, असे आवाहन मोदी यांनी देशवासीयांना केले.

31 ऑक्‍टोबर रोजी सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात एकता दिवस साजरा केला जाणार आहे. तसेच इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनादेखील श्रद्धांजली अर्पण करू, असे मोदींनी स्पष्ट केले. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सरदार यांच्या जन्मदिनीच सरदारांवर (शिखांवर) अत्याचार झाले, हे दुर्दैवी आहे; पण आपण आता एकतेचे दर्शन घडवले पाहिजे.

"मन की बात'
- आयुष्याचा प्रत्येक क्षण राष्ट्रभावनेने प्रेरित होऊन जगणाऱ्या भारतीय जवानांना ही दिवाळी अर्पण करतो. संपूर्ण देश जवानांसोबत आहे
- "संदेश टु सोल्जर' अभियानात सहभागी होत लोकांनी जवानांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार
- प्रथा, परंपरा विसरून मुलगा आणि मुलगी यांना समान मानायला हवे. समाजाला या भेदभावापासून दूर न्यायचे आहे.
दिवाळी हा स्वच्छतेशी संबंधित उत्सव आहे. प्रत्येक जण आपलं घर स्वच्छ करतो. ही स्वच्छता अधिक व्यापक व्हायला हवी.
- चाणक्‍यानंतर देशाला एकजूट करण्याचे काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. त्यांची उद्या (ता. 31) जयंती आहे.

Web Title: Modi dedicates Diwali to soldiers