गांधीजी-मोदी तैलचित्राला २५ लाख रुपये

पीटीआय
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

तिरंगा ध्वजाच्या पार्श्‍वभूमीवरील महात्मा गांधी आणि मोदी यांच्या तैलचित्रासाठी २.५ लाख रुपये मूळ किंमत ठेवण्यात आली होती. हे तैलचित्र २५ लाख रुपयांना विकले गेले.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या विविध भेटवस्तूंच्या ई-लिलावात महात्मा गांधी आणि मोदी यांच्या तैलचित्राला सर्वाधिक २५ लाख रुपयांची रक्कम मिळाली. लिलावातून मिळालेली रक्कम ‘नमामि गंगे’ मोहिमेला दिली जाणार आहे.

‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’मध्ये (एनजीएमए) या वस्तूंचे प्रदर्शन १४ सप्टेंबरपासून सुरू होते, ते तीन ऑक्‍टोबरपर्यंत सुरू राहणार होते; पण मिळणारा प्रतिसाद पाहून त्याची मुदत तीन आठवड्यांनी वाढविण्यात आली. आज लिलाव थांबविण्यात आल्याचे सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. प्रदर्शनातील सर्व वस्तू विकल्या गेल्या आहेत. मोदी यांना मिळालेल्या विविध २,२७२ वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. त्यात स्मृतिचिन्हे, तैलचित्रे, शाली, जाकिटे, मूर्ती आणि पारंपरिक संगीत वाद्यांचा समावेश होता. विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी या प्रदर्शनाला भेटी दिल्या होत्या. 

गणपतीची छोटी मूर्ती आणि कमळाच्या आकारातील कोरीवकाम केलेली लाकडी पेटी या वस्तूंची मूळ किंमत ५०० रुपये ठेवण्यात आली होती. तिरंगा ध्वजाच्या पार्श्‍वभूमीवरील महात्मा गांधी आणि मोदी यांच्या तैलचित्रासाठी २.५ लाख रुपये मूळ किंमत ठेवण्यात आली होती. हे तैलचित्र २५ लाख रुपयांना विकले गेले. मात्र, हे तैलचित्र मोदींना कोणी दिले, याची माहिती मिळाली नाही.

आईचा आशीर्वाद घेणाऱ्या मोदींच्या छायाचित्रासाठी मूळ किंमत एक हजार रुपये होती आणि ते वीस लाख रुपयांना विकले गेले. मणिपुरी संस्कृतीतील वस्तूंची मूळ किंमत ५० हजार रुपये होती, त्याला दहा लाख रुपये किंमत मिळाली. वासराला पाजणाऱ्या गाईच्या धातूच्या शिल्पाला दहा लाख रुपये मिळाले. त्याची मूळ किंमत चार हजार रुपये होती. स्वामी विवेकानंद यांच्या १४ सेंटिमीटर उंचीच्या धातूच्या पुतळ्याची मूळ किंमत चार हजार रुपये असताना त्याला सहा लाख रुपये मिळाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi-Gandhi oil painting