बोले तो गांधीगिरी जिंदाबाद..! 

Modi Government asks all states to have Mahatma Gandhi on their tableau for Republic Day Parade
Modi Government asks all states to have Mahatma Gandhi on their tableau for Republic Day Parade

नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त यंदा प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या राजपथावर होणाऱ्या संचलनातील सर्व चित्ररथ महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याला वाहिलेले असावेत, असे फर्मान मोदी सरकारने काढले आहे.

महाराष्ट्राचा प्रस्तावित चित्ररथही सेवाग्राम आश्रम किंवा मुंबईतून 1942 मध्ये गांधींजींनी सुरू केलेली स्वातंत्र्याची निर्णायक चळवळ 'चले जाव' यावरच आधारित राहणार, असे सूत्रांनी नमूद केले. 

'जीवन हाच माझा संदेश आहे,' असे सांगून गेलेल्या या महात्म्याच्या दीडशेव्या जयंतीचा इव्हेंट जोरदार करण्याचा चंग भाजप सरकारने बांधला आहे. आगामी दोन वर्षे यानिमित्ताने विविध भरगच्च कार्यक्रम आयोजित केले जातील. त्याचा पहिला अध्याय राजपथावर सादर होणार आहे. प्रजासत्ताकदिनानिमित्त होणाऱ्या संचलनात यंदा फक्त गांधीजींचे जीवनकार्य याच विषयाला वाहिलेले चित्ररथ असतील.

यानिमित्त राज्य सरकारांना पाठविलेल्या निर्देशात सरकारने स्पष्टपणे नमूद केले आहे, की राजपथावरील संचलनात आपल्या राज्याचा जो चित्ररथ असेल त्याचा विषय गांधीजींचे जीवनचरित्र हाच असला पाहिजे. विशेषतः गांधीजींनी तुमच्या राज्यातून सुरू केलेला एखादा उपक्रम, जो नंतर राष्ट्रव्यापी चळवळीच्या स्वरूपात देशभरात पोहोचला, अशा उपक्रमावर आधारित देखावा व त्याची संकल्पना यंदा केंद्राकडे सादर करावी. या विषयावर स्वतः पंतप्रधानांचीच देखरेख असल्याने अतिशय काटेकोरपणे नियोजन सुरू आहे. 

डायऱ्यांवरही गांधी 
दरम्यान, गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त संसदेची दोन्ही सभागृहे, तसेच सर्वच्या सर्व केंद्रीय मंत्रालयांमार्फत नव्या वर्षी प्रसिद्ध होणाऱ्या दिनदर्शिका व डायऱ्या यांचीही मध्यवर्ती संकल्पना गांधी हीच असावी, असा दंडक घालण्यात आला आहे. यात पुनरावृत्ती होता कामा नये, असेही बजावण्यात आले आहे. गांधीजींची चित्रे, त्यांच्या स्वाक्षऱ्या, त्यांचे हस्ताक्षर, त्यांच्यावरील रेखाचित्रे यासाठी गांधी स्मृती व राजघाटावरील गांधी केंद्राकडे प्रचंड मागणी असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सेवाग्राम किंवा मुंबई 
महाराष्ट्राचा चित्ररथ हा एका वर्षाआड राजपथावरील संचलनासाठी निवडला जातो. मागील वर्षीच हा मान महाराष्ट्राला मिळाला होता. मात्र, गांधी हा विषय असल्याने यंदाही राज्याला संचलनात सहभागी होण्याची संधी मिळण्याची दाट शक्‍यता आहे.

कारण गांधीजींच्या जीवनात महाराष्ट्रातील वर्धा (सेवाग्राम), मुंबई (गवालिया टॅंक) व पुणे(आगाखान पॅलेस) यांचे स्थान महात्म्य अतूट व अविस्मरणीय आहे. त्यादृष्टीने सेवाग्राम किंवा छोडो भारत चळवळीवर आधारित राज्याच्या चित्ररथाला यंदा संधी मिळण्याची दाट चिन्हे आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com