मोदी सरकारची वर्षपूर्ती! या कार्यकाळातील ऐतिहासिक निर्णयांवर एक नजर

टीम ई-सकाळ
Saturday, 30 May 2020

देश वेगाने प्रगती करत असून संपूर्ण जगासमोर भारत एक आदर्श ठरला आहे असंही मोदींनी म्हटलंय. सरकारने गेल्या सहा वर्षात काही ऐतिहासिक चुकांमध्ये सुधारणा केली असून आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरु असल्याचा विश्वासही त्यांनी पत्रातून व्यक्त केलाय.  

नवी दिल्ली:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिले वर्षे शनिवारी पूर्ण केले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशवासियांना उद्धेशून पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून मोदींनी वर्षभरात सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाच्या आठवणीला उजाळा दिलाय. देश वेगाने प्रगती करत असून संपूर्ण जगासमोर भारत एक आदर्श ठरला आहे असंही मोदींनी म्हटलंय. सरकारने गेल्या सहा वर्षात काही ऐतिहासिक चुकांमध्ये सुधारणा केली असून आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरु असल्याचा विश्वासही त्यांनी पत्रातून व्यक्त केलाय.  

या राज्याने घातली तब्बल पाच राज्यातील लोकांना बंदी

मोदी सरकारच्या गेल्या एका वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या महत्वाच्या घडामोडी-

# मोदी सरकारने जम्मू-काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवले. त्याच बरोबर जम्मू-काश्मिर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले. मोदी सरकारने घेतलेल्या अनेन निर्णयापैकी हा महत्वपूर्ण निर्णय मानला जातो.

# अनेक वर्षे राम मंदीर-बाबरी मशिदचा मुद्दा प्रलंबित होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने विवादित जागेवर राम मंदीर बांधण्याची परवानगी हिंदू पक्षकारांना दिली आहे. तसेच मुस्लीम पक्षकारांना मशिद बांधण्यासाठी इतरत्र 2.7 एकरची जागा देण्याचे आदेश दिले आहेत. मोदी सरकारच्या काळातील ही ऐतिहासिक घडामोड आहे. 

'लॉकडाउन-5' चा निर्णय कोणाच्या कोर्टात?

# मोदी सरकारने देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू केला आहे. यानुसार पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश या देशांमधील हिंदू, शिख, बोद्ध, ख्रिश्चन, जैन, पारशी या अल्पसंख्यांक समाजाला भारताचे नागरिकत्व दिले जाणार आहे. या लोकांना नागरिकत्व मिळण्यासाठी त्यांचा भारतातील रहिवास 2014 पूर्वीचा असला पाहिजे. यातून मुस्लीम धर्मियांना वगळण्यात आलं आहे. 

# मोदी सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकवर कायदेशीर बंदी घातली आहे. पत्नीला तिहेरी तलाक देणाऱ्या मुस्लीम पतीला तुरुगांत पाठवण्याचा कायदा करण्यात आला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाचीही चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले होते.  

# मोदी सरकारने संरक्षण प्रमुख (चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ) या नवीन पदाची निर्मिती केली आहे. हे नवीन पद तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. देशाचे पहिले संरक्षण प्रमुख बिपीन रावत ठरले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: modi government completed one year modi government big decition in one year period