मोदी सरकारने आमच्या हत्येचा कट रचला : फारुख अब्दुल्ला

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने रचला आमच्या हत्येचा कट 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आमच्या हत्येचा कट रचला, असा गंभीर आरोप नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी केला. सरकारने बळाचा वापर करुन काश्मीरमधील नेत्यांना अटक केली, असेही ते म्हणाले.

काश्मीरातील कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने काल (सोमवार) घेतला. त्यानंतर आता फारुख अब्दुल्ला यांनी माध्यमांशी बोलताना यावरून टीका केली. ते म्हणाले, केंद्र सरकारने बळाचा वापर करुन काश्मीरमधील नेत्यांना अटक केली. माझे राज्य जळत असताना मी माझ्या घरात माझ्या इच्छेने कसा काय राहीन, असाही प्रश्न अब्दुल्ला यांनी केला. ज्या भारतावर माझा विश्वास आहे तो हा भारत नाही असेही अब्दुल्ला यांनी सांगितले. 

तसेच ते पुढे म्हणाले, आम्ही ग्रेनेड फेकणारे किंवा दगडफेक करणारे नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने आमची लढाई लढतो आहोत. कलम 370 वरुन सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. कलम 370 संविधानाला धरुन नाही, या निर्णयाला आपण आव्हान देऊ असेही अब्दुल्ला यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Modi government conspired to assassinate us says Farooq Abdullah