भाजपचे खासदारच म्हणतात, राम मंदिर बनवण्यास मोदी सरकार करतंय उशीर (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

- राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो चुटकीसरशी.  

- नरेंद्र मोदी यांना कुणीतरी देतंय चुकीचा सल्ला. 

मुंबई : राम मंदिराचा प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतो. मात्र, नरेंद्र मोदी यांना कुणीतरी चुकीचा सल्ला देतंय. यामुळे राम मंदिर उभारण्यास विलंब होत आहे, असे भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले.

स्वामी यांनी 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. स्वामी यांनी तासभर सुरू असलेल्या भेटीत राम मंदिर उभारणीबाबत चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनी 18 खासदारांसह रविवारी अयोध्या दौरा केला आणि राम मंदिर उभारणीचा प्रश्न पुन्हा उचलून धरला आहे. उध्दव ठाकरे यांच्या या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राम मंदिराबाबत उद्धव यांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद असून, उद्धव यांच्याबरोबर इतर घटक पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा करू. शिवाय राम मंदिर उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लवकरच भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राम मंदिरांच्या अविवादीत जागेवर मंदिर बनविण्यास सुरवात करावी, असे त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितले. विवादित जागेबाबत न्यायालयाने निर्णय घेण्यास काही हरकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सुन्नी वक्फ बोर्डाने मस्जिद अयोध्येच्या बाहेर बांधावी. आम्ही त्यांना मदत करू, असेही स्वामी पुढे म्हणाले.

राम जन्मभूमी येथील विवादित आणि अविवादीत जमिनीचं राष्ट्रीयीकरण तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी केलं होतं तसे पत्र आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. यामुळे कोणाचीही परवानगी न घेता सदर जमीन मंदिर बनवायला देता येऊ शकते.

राम जन्मभूमी न्यास समिती आणि विश्व हिंदू परिषद या दोन संस्थांना मंदिर बनविण्यासाठी जमीन देण्यात यावी. राम मंदिरचा प्रश्न यामुळे निकाली निघू शकतो. मात्र, याबाबत भाजप सरकारला आणि नरेंद्र मोदींना कोणीतरी चुकीचा सल्ला देत आहेत, असेही ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi government to delay the construction of Ram temple says Subramanian Swamy